केटीएफ, जेकेजीएफचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने हरविंदर सिंह संधू उर्फ रिंदाला शुक्रवारी दहशतवादी घोषित केले आहे. तसेच खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) आणि जम्मू-काश्मीर गजनवी फोर्सला (जेकेजीएफ) दहशतवादी संघटनेच्या स्वरुपात घोषित पेले आहे. अधिनियमाच्या पहिल्या अनुसूची अंतर्गत घोषित दहशतवादी संघटनांचा आकडा आता 44 वर पोहोचला आहे.
हरविंदर सिंह संधू उर्फ रिंदा हा बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. तसेच तो सध्या पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आश्रय घेऊन आहे. पंजाबमधील विविध दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे.
खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेने पंजाबमध्ये दहशतवाद फैलावण्याचा कट रचला असून भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. पंजाबमधील टार्गेटेड किलिंगमध्ये केटीएफचा हात आहे. जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न, अमली पदार्थ अन् शस्त्रास्त्रांची तस्करी तसेच दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.