नवी दिल्ली/प्रतिनिधी
हरियाणा करनालमध्ये शनिवारी भाजपच्या बैठकीच्या विरोधात शांतपणे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी जबरदस्त लाठीचार्ज केला आहे. यामध्ये शेकडो शेतकरी रक्तबंबाळ झालेत. लाठीचार्ज झाल्यांनतर हरियाणातील एका एसडीएमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचा आदेश हे एसडीएम देत आहेत. या व्हिडीओ नंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ दिल्लीचे आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान यांनी ट्वीट केला आहे.


करनालमध्ये पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स लावून रस्ते अडवले होते. जर शेतकऱ्यांनी ‘ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा. मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे. लिखित देतो. सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा. कोणतीही शंका नाही, कुठल्याजी आदेशाची गरज नाही. क्लिअर आहात तुम्ही. हा नाका कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुटू देणार नाही. आपल्याकडे पर्यात फोर्स आहे. 100 लोकांची फौज आहे. इथं तुम्हाला सुरुवातीच्या बंदोबस्तासाठी उभं केलं आहे. कोणतीही शंका नाही. करणार ना लाठीचार्ज? इथून एकही माणूस गेला नाही पाहीजे, असे आदेश देताना हे एसडीएम महाशय दिसून येत आहेत. दिल्लीचे आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.