महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याच्या एफआयआरनंतर संदीप सिंग यांचा पदत्याग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हरियाणाचे क्रीडामंत्री आणि ऑलिम्पियन संदीप सिंग यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चंदीगडमध्ये महिला प्रशिक्षकाच्या छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रविवारी उघड झाल्यानंतर माजी भारतीय हॉकीपटू संदीप सिंग यांनी सकाळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. आपल्यावरील आरोप हे कटकारस्थान असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
क्रीडा विभागाच्या ज्युनियर महिला प्रशिक्षकाने संदीप सिंग यांच्याविरोधात तक्रार केली होती. ज्यामध्ये क्रीडामंत्र्यांवर विनयभंग आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. चंदीगडमधील सेक्टर 26 पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्हय़ात आयपीसीच्या कलम 354, 354ए, 354बी, 342 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.
षड्यंत्र रचल्याचा आरोप
राजीनामा दिल्यानंतर संदीप सिंग यांनी आपल्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा केला आहे. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी वातावरण तयार केले जात आहे. एका ज्युनियर महिला प्रशिक्षकाने माझ्यावर आरोप केले आहेत. नैतिकतेच्या आधारावर मी माझे क्रीडा खाते मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अहवाल आल्यावरच मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला प्रशिक्षकाचा दावा
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला क्रीडा विभागात कनि÷ प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर संदीप सिंग यांनी आपल्याला इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर मेसेज पाठवले. तसेच भेटायलाही बोलावले. मी भेटायला न गेल्यामुळे मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक आणि अनब्लॉक करण्यात आले होते, असा दावा संबंधित महिला प्रशिक्षकाने केला आहे. यासंबंधी कनि÷ महिला प्रशिक्षकाने हरियाणा पोलिसांसह चंदीगड पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.
विशेष तपास पथक स्थापन
हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यावर कनि÷ महिला प्रशिक्षकाने आरोप केल्यानंतर डीजीपींनी एसआयटीची स्थापना केली आहे. ज्यामध्ये आयपीएस ममता सिंग आणि समर प्रताप सिंग यांच्यासह एचपीएस राजकुमार कौशिक यांचा समावेश करण्यात आला आहे. ममता सिंग एसआयटीचे नेतृत्व करत आहेत.