हैद्राबादच्या संशयिताला अटक : चार दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी /पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) पर्वरी येथे केलेल्या कारवाईत 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा हशिश हा अमलीपदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक पेलेल्या संशयिताचे नाव पृध्वी श्रीनिवास पेनमाथसा (वय 25, राहणार मियापूर हैद्राबाद) असे आहे. तो ड्रग्सची विक्री करण्यासाठी मंगळवारी सकाळी गोव्यात आला होता. पर्वरी येथील गौतम हॉटेलजवळ ग्राहकाची वाट पाहत तो थांबला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 740 ग्रॅम हशिश तेल जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत 7 लाख 40 हजार रुपये आहे.
हैद्राबादमधून आणले हशिश
ड्रग्सची विक्री करण्यासाठी हैद्राबादमधून एक संशयित गोव्यात येत असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पणजी बसस्थानकावर सापळा रचला होता. संशयित बसमधून उतरला आणि लगेच पर्वरीला निघाला होता. पोलिसांनी त्याचा पर्वरीपर्यंत पाठलाग केला. संशयित गौतम हॉटेलजवळ थांबला असता त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे हशिश तेल सापडले नंतर त्याला अटक करून पुढील कारवाई करण्यात आली.
एएनसी निरीक्षक शोबीत सक्सेना (आयपीएस), उपनिरीक्षक नॅरलॉन आल्बुकर्क व निरीक्षक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश खांडोळकर, संदेश वळवईकर, नितेश मुळगावकर, सुदिन लिंगुडकर, यांनी ही कारवाई केली. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.