मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : कुणबी हातमाग संस्थेचे उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत आयोजित एका कार्यक्रमात कुणबी हातमाग उत्पादक संस्थेचे उद्घाटन केले. सांगे येथे सुमारे 16000 चौ. मी. जागेत रु. 20 कोटी खर्च करून हँडलूम व्हिलेज (हातमागाचे गाव) साकारणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली. कुणबी साडी व इतर उत्पादने यांच्या प्रसार, प्रचार करून त्यांना बाजारपेठेत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच उत्पादनात वाढ करावी असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले की कुणबी हँडलूमतर्फे बनवण्यात येणाऱया शाली सरकारी कार्यक्रमात मानसन्मान करण्यासाठी वापरण्यात येतील. तसे परिपत्रक सरकारतर्फे काढण्यात येईल. त्यामुळे त्या शालींना मागणी वाढेल. कुणबी साडी देखील लोकप्रिय असून ती आणखी वाढवण्यासाठी सर्वांनी साडी, शाली यांचा वापर करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी नमूद केले. नाबार्डच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कुणबी साडीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम, उपक्रम राबवले जाणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. त्यासाठी नाबार्डने रु. 50 लाखाचा निधी दिला असून त्याच सदुपयोग करा आणि कुणबी हातमागाची उत्पादने वाढवा असा सल्ला डॉ. सावंत यांनी दिला. महिलांनीच आता त्यासाठी पुढाकार घ्यावा असे डॉ. सावंत यांनी सुचवले. पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता.
त्यावेळी हस्तकला खाते मंत्री रवी नाईक, हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर, नाबार्डचे अधिकारी, कुणबी साडी तयार करणाऱया महिला कारागीर यांची उपस्थिती होती. काही कुणबी कारागीरांचा डॉ. सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कुणबी साडी तयार करण्याची कला महिलांनी शिकून घ्यावी. सरकार त्याकरीता बाजारपेठेची सोय करेल व कुणबी साडीला उत्तेजन देण्यात येईल. कोरगाव व सांगे येथे कुणबी साडी केंद्रे असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.