वेल्लोर : तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात हवाल्याचे 10 कोटी जप्त करण्यात आले. या प्रकरणी चौघांना ताब्यात घतले असून पल्लीकोंडा पोलिस स्टेशन मध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. या रकमेसंबंधी योग्य ती कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरल्याने हे पैसे हवाल्याचे असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
पल्लीकोंडा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल गुरुवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना राष्ट्रीय महामार्गाजवळ काही लोक कारमधील काही गुंडाळलेल्या वस्तू ट्रकमध्ये भरत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस हवालदारांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. मात्र, चौघांनी परस्परविरोधी वक्तव्य केले. गुंडाळलेल्या वस्तू उघडल्यावर त्यात पैसे असल्याचे दिसून आले. सापडलेल्या पैशांबाबत कोणतीही कागदपत्रे संशयितांकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी सर्व पैसे जप्त केले. यामध्ये एकूण 10 कोटी रकमेसह कार आणि ट्रक जप्त ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेले चौघेजण हे पैसे केरळला नेण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. वेल्लोर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेश कन्नन तपासाचे नेतृत्व करत आहेत. 10 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती वेल्लोर येथील आयकर विभागाला देण्यात येणार असून रोख त्यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

