वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज मॅथ्यू हेडनची टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाच्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसऱयांदा त्याची ही नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी 2021 मध्येही तो या संघाचा मेंटर होता.
मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत पाक संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची कामगिरी पाहून पीसीबीने त्याला पुन्हा एकदा या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. 2021 मधील स्पर्धेत पाकने भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया यांचा लीग टप्प्यात पराभव केला होता. 15 ऑक्टोबरपासून ब्रिस्बेनमध्ये तो पाक संघात सामील होईल. न्यूझीलंडमधील टी-20 मालिका संपवून याच दिवशी पाक संघ ख्राईस्टचर्चहून तेथे दाखल होणार आहे. पाक संघाची अलीकडील कामगिरी पाहता विश्वचषकातही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीचे अपेक्षा असल्याचे हेडन म्हणाला.