226 टक्क्यांची बंपर कमाई : 3 हजार 593 कोटींचा नफा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एचसीएल टेक्नॉलॉजीसचा जानेवारी ते मार्चदरम्यानचा चौथ्या तिमाहीचा नफ्याचा अहवाल घोषित करण्यात आला असून सदरच्या तिमाहीत कंपनीने 3 हजार 593 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. सदरचा नफा वर्षाच्या तुलनेत पाहता 226 टक्के अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एक वर्ष आधी याच कालावधीत कंपनीने 1 हजार 102 कोटी रुपये नफा प्राप्त केला होता. तिसऱया तिमाहीत कंपनीने 3 हजार 442 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.
महसूलही दमदार
चौथ्या तिमाहीत कंपनीने 15 टक्के वाढीसह 22 हजार 597 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीत कंपनीने 19 हजार 642 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. यादरम्यान एचसीएलने 18 रुपये प्रति समभाग लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
40 हजार जणांना नोकरी
कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 40 हजार नव्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले आहे. यामुळे एकूण कर्मचाऱयांची संख्या 2 लाख 8 हजार 877 वर पोहचली आहे. तिमाहीत 11 हजार 100 जणांना नोकरीत सामावून घेतले आहे.
तिमाहीचा कालावधी सर्वोत्तम- विजयकुमार
कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार म्हणाले, आमच्या सेवा व्यवसायासाठी तिमाहीचा कालावधी हा उत्तम ठरला आहे. महसूल तिमाहीच्या आधारावर 5 टक्के आणि वर्षाच्या आधारावर पाहता 17 टक्के वाढला आहे. ही सर्वाधिक वाढीची कामगिरी कंपनीची राहिली आहे.