बिहारचे दशरथ मांझी यांनी आपल्या पत्नीच्या सोयीसाठी मोठा पहाड तोडून रस्ता बनविल्याची घटना जवळपास सर्वांना माहिती आहे. असाच पराक्रम मध्यप्रदेशातील सिधीनजीकच्या ग्राम बरबंधा येथील हरिसिंग यांनीही केला आहे. त्यांनी खडकाळ डोंगर फोडून 60 फूट खोल विहीर बनविली आहे. पत्नीला पिण्याचे पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर पायी चालत जावे लागते, हे त्यांच्याने पाहावत नव्हते. पत्नीचे श्रम संपावेत म्हणून त्यांनी पहाड खोदून विहीर बनविण्याचे अशक्मयप्राय वाटणारे काम हातामध्ये घेतले आणि ते पूर्ण करून दाखविले.


त्यांची पत्नी सीयावती नेहमी पाण्याच्या चिंतेत रहात असे. तिला दोन-तीन किलोमीटर चालत जाऊन दररोज दोन-तीन वेळेला पाणी आणावे लागत असे. यामुळे तिची प्रकृतीही बिघडत असे. तिचे श्रम वाचावेत यासाठी त्यांनी स्वतःच हातोडी आणि छिन्नी घेऊन डोंगर फोडण्याचा निर्धार केला. हा भाग खडकाळ असल्याने तेथे पाणी लागणार नाही, अशी अनेकांची अटकळ होती. त्यांनी हरिसिंग यांची खिल्लीही उडविली. तथापि, ते निश्चयापासून ढळले नाहीत. अखेरीस दोन वर्षांच्या परिश्रमानंतर एक हाती ही 60 फूट खोलीची विहीर खोदली आहे. या विहिरीला पाणीही लागल्याने त्यांच्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे. कोणाचेही सहकार्य त्यांना लाभले नसतानाही त्यांनी अशक्मयप्राय वाटणारी ही बाब शक्मय करून दाखविल्याने त्यांचा पंचक्रोशीत गौरव होत असून मध्यप्रदेश सरकारनेही त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. त्यांची तुलना आता दशरथ मांझी यांच्याशी होत आहे. आता या विहिरीचा लाभ आसपासच्या कुटुंबांनाही होत आहे.