स्मृती इराणींच्या पतीची भागिदारी असल्याचे स्पष्ट
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबियांकडून आसगाव येथे चालवल्या जाणाऱया ‘सिली सोल्स कॅफे अँड बार’ या कथित वादग्रस्त आस्थापनाने बेकायदेशीररित्या अबकारी परवाना मिळवल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची पुढील सुनावणी आज दि. 12 रोजी अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्यासमोर होणार आहे.
या आस्थापनासाठी अँथनी डिगामा यांच्या नावे अबकारी परवाना देण्यात आला होता. त्यांचे गत वषी 17 मे रोजी निधन झाले होते. मात्र नंतर जून 2022 मध्ये त्यांच्याच नावाने परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचा दावा तक्रारदार आयरीश रॉड्रिग्स यांनी केला होता.
झुबिन इराणी आहेत संचालक
या सुनावणीत 21 जुलै रोजी अबकारी खात्याने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसला डिगामा कुटुंबियांनी सादर केलेल्या उत्तरावर ऍड. रॉड्रिग्स यांना उत्तर दाखल करायचे आहे. दरम्यानच्या काळात ऍड. रॉड्रिग्स यांनी आरटीआयअंतर्गत सदर लीज कराराची प्रत प्राप्त केली आहे. त्यानुसार आसगाव येथील सिली सोल्स कॅफे अँड बार आस्थापन असलेली मालमत्ता अँथनी डिगामा यांनी एटॉल फूड अँड बेव्हरेजीस लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप यांना लीजवर दिली होती. या कंपनीत उग्रया मर्कंटाईल प्रा. लि. या आस्थापनाची भागिदारी असून तिच्या संचालकपदी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी आहेत.
दि. 7 जानेवारी 2021 रोजी म्हापसा येथे हा भाडेकरार झाला होता. त्यात दि. 1 जानेवारी 2021 पासून पुढील 10 वर्षांसाठी दरमहा 50 हजार रुपयांच्या भाडय़ाने लीज लागू आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष करार होण्यापूर्वीच 5 जानेवारी 2021 रोजी डिगामा यांच्या नावाने अबकारी परवान्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
आस्थापन एक परवाना दुसऱयाच नावाने
दरम्यान, असाच प्रकार अन्न आणि औषध प्रशासनालयाने दिलेल्या परवान्या बाबतही दिसून आला आहे. आस्थापनाचे नाव सिली सोल्स पॅफे असले तरी परवाना मात्र एटॉल फूड अँड बेव्हरेजेस यांच्या नावे आहे. तसेच त्यांची जीएसटी नोंदणीही एटॉलच्याच नावे आहे. गत जुलै महिन्यात अबकारी परवान्याच्या कायदेशीरतेचा वाद सुरू झाल्यापासून सिली सोल्स कॅफे आणि बार बंद आहे.