नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यांच्यासंबंधी निवडणूक आयोगासमोर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी मंगळवार, 17 जानेवारीला झालेल्या युक्तिवादानंतर ठाकरे गटाच्या वतीने आणखी काही मुद्दे मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्रवारी पुन्हा सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली असून त्यात ठाकरे गटाचे वकील ऍड. कपिल सिब्बल महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात. तसेच शिंदे गटातर्फेही त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंबंधी निवाडा देऊ शकते. मात्र, हा निवाडा कधी जाहीर होईल याबाबत अद्याप निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभरातील विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे.