वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
500 अन् 1000 रुपये मूल्यांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या केंद्र सरकारच्या 2016 च्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली आहे. न्यायाधीश एस.ए. नजीर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने ही सुनावणी स्थगित केली आहे. यापूर्वी ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमण यांनी याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. या घटनापीठात न्यायाधीश बी.आर. गवई, ए.एस. बोपन्ना, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी.व्ही. नागरत्ना यांचा समावेश होता. घटनापीठाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एक आठवडय़ांची मुदत दिली आहे. घटनापीठासमोर नोटाबंदीच्या आदेशाला आव्हान देणाऱया 58 याचिकांवर सुनावणी सुरू आहे.