दापोलीतील मकरंद म्हादलेकर यीं दिल्ली न्यायालयात फिर्याद
प्रतिनिधी / दापोली
दिल्ली येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत दापोली भाजपा तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिल्ली न्यायालयात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणी गांधींविरोधात फौजदारी कारवाई करण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे एक अल्पवयीन मुलगी बलात्काराला बळी पडली होती. तिच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते यानंतर गांधी यांनी सांत्वन करतानाचे कुटुंबीयांसमवेतचे फोटो आपल्या ट्विटर वरून सार्वजनिक केले होते. यामुळे या पीडितेची ओळख सार्वजनिक झाली असा मकरंद म्हादलेकर यांनी आक्षेप घेत याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर हे फोटो ट्विटर वरून हटवण्यात आले होते
आता म्हादलेकर यांनी आपली बाजू मांडण्याकरिता ऍड. उमेश शर्मा नामक दुसरे वकील नेमले असून 28 मार्च रोजी या दाव्याची सुनावणी होणार आहे. यामुळे आता याप्रकरणी न्यायालय कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.