Tarun Bharat

शिवसेना चिन्हासंबंधी सुनावणी 12 डिसेंबरला

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ः दोन्ही गटांना दिली माहिती

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

शिवसेना या राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह यांच्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी येत्या 12 डिसेंबरला सुनावणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पक्षाच्या दोन्ही गटांना ही माहिती देण्यात आली असून सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

20 जून 2022 या दिवशी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडला होता. शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 40 आमदार या शिंदे गटात आहेत. या गटाने आपलीच शिवसेना खरी असल्याचे प्रतिपादन केले आहे. या गटाने 30 जून 2022 या दिवशी भारतीय जनता पक्षाशी युती करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे तेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेनेच्या गटांमधील वाद सुरू आहे.

अंतरिम आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर 2022 या दिवशी एका अंतरिम आदेशाद्वारे शिवसेना हे नाव आणि त्या पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर तलवार आणि ढाल हे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव तर मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र ही व्यवस्था केवळ अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.

अंतिम निर्णयाची अपेक्षा

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह यांच्यासंबंधात अंतिम निर्णय निवडणूक आयोग लवकरच घेईल, अशी अपेक्षा आहे. 9 डिसेंबरपर्यंत दोन्ही गटांनी आणखी कागदपत्रे आणि पुरावे असल्यास ते सादर करावेत असाही आदेश आयोगाने दिला असून त्यानंतर 12 डिसेंबरला सुनावणीस प्रारंभ होईल. खरी शिवसेना कोणाची हा निर्णयही निवडणूक आयोगालाच घ्यावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यावा असा निर्णय दिला होता.

Related Stories

सैन्याला मिळाले स्वदेशी चिलखती युद्धवाहन

Patil_p

उत्तराखंड : विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांची कोरोनावर मात

Tousif Mujawar

बेडय़ांमध्ये जखडून घेत मागतोय मत

Patil_p

लोकांना वीज-पाण्यासह मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन

Patil_p

“मोदी सरकार ब्रिटिशांप्रमाणे काम करतंय, अन्यायापुढे झुकणार नाही”; काँग्रेस नेत्यांचा संताप

Archana Banage

वाराणसी – जौनपुर हायवेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू; 10 जखमी

Tousif Mujawar