कुटुंबासमवेत देवदर्शन-फिरण्यासाठी गेलेल्या कारला अपघात : पत्नी-मुले जखमी
मच्छे / वार्ताहर
पिरनवाडी येथील दिलदार व्यापाऱ्याची एक्झिट चटका लावणारी घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजता घडली. कुटुंबासमवेत देवदर्शन व फिरण्यासाठी गेलेल्या कारला अपघात झाला आणि बाहुबली कल्लाप्पा देसाई (वय 50, रा. पिरनवाडी) हे व्यापारी जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी व दोन मुले जखमी झाली आहेत.
बाहुबली कल्लाप्पा देसाई यांचे पिरनवाडी येथे होलसेल दुकान असून ते प्रामाणिक व्यापारी होते. साधे राहणीमान आणि मनमिळाऊ बोलण्यानं त्यांचे ग्राहकांशी अतुट नाते बनले होते. मच्छे, पिरनवाडी, किणये, संतिबस्तवाड, नावगे व पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणात ग्राहक त्यांच्या दुकानात खरेदीसाठी येत होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे पिरनवाडी व परिसरातील गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बाहुबली देसाई हे आपल्या कुटुंबासह शृंगेरीसह विविध ठिकाणी फिरण्यासाठी व देवदर्शनासाठी गुरुवारी गेले होते. नुकतीच त्यांनी नवीन कारगाडीही खरेदी केली होती. शृंगेरीहून ते शिमोग्याला जात होते. यावेळी त्यांच्या कारला शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास शिमोगा जिल्ह्यातील कोप्पा येथे अपघात झाला. यामध्ये बाहुबली हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी सुजाता व दोन मुले दर्शन तसेच सम्मेद हे तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगाव येथील इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. मृत बाहुबली यांच्यावर शनिवारी कुट्टलवाडी येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.