Tarun Bharat

उष्णतेची लाट…मान्सून सुसाट…

यंदाचा उन्हाळा हा भारतासह जगासाठी रेकॉर्डबेक ठरला असून, अनेक विक्रम  यावर्षी नोंदविण्यात आले आहेत. वाढते जागतिक तापमान हे जागतिक तापमानवाढीचा द्योतक मानले जात असून, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हाच्या झळा सोसत असतानाच मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. यंदाचा पावसाळा हा सरासरीच्या 99 टक्के राहण्याची सुवार्ताही हवामान विभागाने दिली असून, पूर्वमोसमीनेही तडाखा दिल्याने ऊन-पावसाचा खेळ देशवासियांना अनुभवायला मिळत आहे.

यावर्षी मार्चपासूनच देश तापायला सुरुवात झाली. मार्च महिन्यातही रेकॉर्डब्रेक कमाल तापमान नोंदविण्यात आले. मार्च, एप्रिल तसेच चालू मे महिन्यात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने लाही-लाही केली. कमाल तापमान 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच जम्मू काश्मीरमध्येही उष्णतेच्या लाटेच्या झळा पसरल्या. या भागात कमाल, किमान तसेच सरासरी तापमान वाढलेले होते. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना यंदा चांगलाच उकाडा जाणवला. महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच विदर्भात उष्णतेच्या झळा जाणवल्या. त्यातही विदर्भात कित्येक दिवस उष्णतेच्या लाटांचा मारा होता. चंद्रपूर, अकोला येथे भारतातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. येथील पारा 46 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला. यावर्षी पाकिस्तान तसेच भारतामध्ये उष्णतेच्या झळा तीव्र होत्या. मे महिन्यात अतीतीव्र उष्णतेच्या लाटा सुरू होत्या. त्यातच पाकिस्तानातील जकोबाबाद या भागात 14 मे रोजी 50 अंश सेल्सिअस इतके आतापर्यंतचे सर्वात जास्त जागतिक तापमानाची नोंद झाली.

Advertisements

मार्च, एप्रिल 122 वर्षांतील सर्वांत उष्ण महिने

दरम्यान, यंदाचा मार्च महिनाही हा भारताच्या 122 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना ठरला असून, मार्चमध्ये या कालावधीतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय विभागाकडून देण्यात आली. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने प्रामुख्याने उन्हाळय़ाचे मानले जाते. मार्चपासून खऱया अर्थाने उन्हाळा जाणवण्यास सुरुवात होत असते. परंतु, 2022 चा उन्हाळा मागच्या शतकभरातील उन्हाळय़ापेक्षा कितीतरी तीव्र असल्याचे समोर आले आहे. मार्चमध्ये देशातील अनेक भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात (मार्च 2022) सरासरी मासिक दिवसाच्या तापमानाचा पारा 33.1 अंशांवर नोंदवला गेला. हे 1901 सालानंतरचे महिन्यातील सर्वांत उष्ण तापमान ठरले आहे. याशिवाय यंदाचा एप्रिल महिना हा गेल्या 122 वर्षातील एप्रिल महिन्यातील चौथा सर्वाधिक तापमानाचा महिना ठरला आहे. या महिन्यात कमाल तसेच सरासरी तापमान या महिन्यात 35.05 सेल्सिअस नोंदविण्यात आला आहे, तर एप्रिल महिन्यातील वायव्य व मध्य भारतातील कमाल तापमानाची सरासरीही गेल्या 122 वर्षातील सर्वाधिक नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत वायव्य भारतात 35.90 अंश सेल्सिअस तर मध्य भारतात 37.78 अंश सेल्सिअस इतके तापमान होते.

असानी चक्रीवादळ

मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत यावर्षी पहिले असानी हे चक्रीवादळ निर्माण झाले. वादळ जमिनीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा प्रभाव कमी झाला होता. मात्र, यामुळे आंध्रप्रदेश, ओडिशा या भागात अतिवृष्टी झाली. बाकीच्या वादळांच्या तुलनेत या वादळाने या भागात कमी नुकसान झाले.

उष्णतेची लाट ओसरले

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ देशवासियांना उष्णतेच्या लाटेने ग्रासले होते. यात अनेकांचा बळीही गेला. राजस्थानने तीव्र उष्णतेची लाट अनुभवली, त्याखालोखाल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात उष्णतेचा कडाका अधिक राहिला. दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाच्या आधी बंगालच्या उपसागरात असानी चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळाच्या प्रभावामुळे मान्सूनचे अंदमानातील आगमन लवकर झाले. सध्या पूर्वमोसमी पाऊस देशात सक्रिय झाला असून, पूर्व किनारपट्टी, दक्षिण भारत, पूर्वोत्तर भारत तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच 21 मेपासून भारतातील उष्णतेची लाट ओसरल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सूनचे आगमन लवकर

नैर्त्रुत्य मोसमी वारे यंदा सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाले आहेत. तसेच मान्सूनचे केरळातील आगमनही त्याच्या निर्धारित वेळेच्या आधी 27 मेपर्यंत होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मान्सून अंदमानात 22 मे रोजी, तर केरळात 1 जूनला दाखल होतो. यंदा त्याचे आगमन लवकर होणार असल्याने उष्णतेच्या झळांपासून मुक्ती मिळणार आहे. अवघ्या चार दिवसांत मान्सून (20 मे रोजी) अरबी समुद्रात प्रवेश केल्याने केरळ, कर्नाटक, गोवा तसेच महाराष्ट्रातही त्याचे आगमन लवकर होण्याची चिन्हे आहेत.

मान्सूनची गुड न्यूज; सरासरीच्या 99 टक्के पाऊस

भारतीय हवामान विभागाने देशवासियांसाठी गुड न्यूज दिली असून, यंदाचा जून ते सप्टेंबर या कालावधीतील मान्सून सरासरीच्या 99 टक्के बरसणार आहे. देशातील पूर्वोत्तर भाग तसेच तुरळक भाग वगळता सर्वत्र यंदा दमदार पाऊस होणार आहे. यामुळे पिक-पाण्यासह सर्व क्षेत्रात याचा सकारात्मक परिणाम जाणवणार आहे. भारतीय हवामान विभाग दरवर्षी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर करते, यानंतरचा दुसऱया टप्प्यातील अंदाज मे महिन्यात देण्यात येतो. ऑपरेशनल स्टॅटीस्टीकल एन्सेबल फॉरकास्टींग सिस्टीम (एसईएफएस)नुसार हा अहवाल देण्यात आला आहे. जून ते सप्टेंबरच्या कालावधीत 87 मिमी इतका पाऊस होतो. या अंदाजानुसार सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असून, यात पाच टक्के कमी अधिकता राहील. याअंतर्गत अवर्षणाची शक्यता 14, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 26, सरासरी इतका पाऊस 40, तर अतिरिक्त पावसाची शक्यता 5 टक्के आहे.

मान्सूनवर प्रभाव टाकणाऱया समुद्रांची स्थिती

सध्या विषुवृत्तीय प्रशांत महासागरावर ला निनोची स्थिती आहे. ही स्थिती येत्या पावसाळय़ापर्यंत कायम राहील. ला निनोची स्थिती ही चांगल्या मान्सूनचे द्योतक असते, तर एल निनो हा मान्सूनवर विपरित परिणाम करतो. सध्या हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल हा तटस्थ आहे. मान्सूनच्या सुरुवातीपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यानंतर पुढे तो ऋण स्थितीत जाईल. हे सर्व घटक अनुकूल मान्सूनचे संकेत दर्शवितात. प्रशांत तसेच हिंद महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचाही मान्सूनवर परिणाम होता, हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात आबादानी

या अहवालानुसार, देशातील मैदानी भागातील राज्ये, पूर्व, पश्चिम, मध्य भारतातील राज्यांत चांगला पाऊस राहणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात यंदा सरासरीहून अधिक पाऊस राहील. मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता कोकण, गोवा, मराठवाडा तसेच विदर्भात यंदा पावसाची आबादानी राहील. मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम, छत्तीसगड, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान-निकोबार बेटे, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरातचा दक्षिण भागात चांगला पाऊस राहील.

कमी पावसाची क्षेत्रे

आसाम, अरुणाचल प्रदेशचा काही भाग, नागालॅन्ड, मणिपूर, त्रिपुराचा काही भाग, तामिळनाडू, केरळचा दक्षिण भाग, पश्चिम बंगालचा सुंदरबनचा भाग, हरियाणा, जम्मू काश्मीर, पूर्व राजस्थानच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची चिन्हे आहेत.

मे महिन्यात शेवटचा अंदाज

जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी असतो. एप्रिलच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजानंतर मे महिन्यात हवामान विभाग दुसरा व शेवटचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करते. यात मान्सून कोअर झोन, महिन्यानुसार पावसाची शक्यता, तसेच जून महिन्यातील पावसाचा अंदाजही जाहीर करण्यात येईल.

शेतीचे उत्पादन वाढणार; महागाई कमी होणार

चांगल्या पावसामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे, गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनांवर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र तो अनुशेष भरण्याची शक्यता आहे. याशिवाय मान्सून अन्य क्षेत्रांवरही परिणाम करतो. कोरोनातून देश बाहेर पडत असताना मान्सूनच्या या बातमीमुळे अर्थव्यवस्थेलाही बूस्टर मिळेल, तर सामान्य नागरिकाला यामुळे दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

सासकॉफचेही शिक्कामोर्तब

साउथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरमने (सासकॉफ) आपल्या वार्षिक परिषदेचा अहवाल जाहीर केला असून, यानुसार यंदा नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सून भारतासह पाकिस्तान, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात  सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020 पासून ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडते. यंदाही 26 ते 28 एप्रिल दरम्यान ही बैठक ऑनलाईन पार पडली. दक्षिण आशियाई भागातील पाकिस्तान, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका, भारत, बांग्लादेश, म्यानमार नऊ देशातील हवामान तज्ञ यात सहभागी झाले होते.

या अहवालानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, पूर्व म्यानमार, उत्तर श्रीलंकेच्या भागात सरासरीहून अधिक पाऊस होईल. उत्तर अफगाणिस्तानचा काही भाग, बांग्लादेशचा अर्ध्याहून अधिक भाग, म्यानमारचा दक्षिणेचा भाग, श्रीलंकेचा दक्षिण भाग, मालदीवच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील.

भारत पाणीदार

भारतात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशचा काही भाग, वायव्य राजस्थानचा थोडासा भाग, केरळ, तामिळनाडूचा काही भाग, तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची चिन्हे आहेत. हा भाग वगळता भारतात सर्वत्र अतिरिक्त पाऊस वर्तविण्यात आला आहे. अवर्षण असणाऱया गुजरात व राजस्थानातही यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, तर उत्तरेकडील राज्ये, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र, सिक्कीम, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी राज्यांत यावर्षी जोरदार पावसाचे संकेत आहेत. मान्सूनच्या कालावधीत ला निनो ची स्थिती कायम राहणार आहे. महाराष्ट्राच्या कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची चिन्हे आहेत.

 यंदाचा उन्हाळा कडक राहिला, तसा पावसाळाही दमदार राहील, असा अंदाज आहे. पूर्वमोसमीने वातावरणनिर्मिती झाली असून, आता मान्सूनची प्रतीक्षा आहे. पाऊस हा आनंदाचे प्रतीक मानले जातो. अर्थात त्याकरिता पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करावे लागेल. तसेच पूर वा अन्य नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कशी कमी राहील, याकरिताही सूक्ष्म उपाय योजावे लागतील.

– अर्चना माने-भारती, पुणे

Related Stories

जगप्रसिद्ध ‘डार्विन्स आर्च’ कोसळली

datta jadhav

राम मंदिर भूमिपूजनासाठी पुण्यातून एक किलो चांदीची शिला

Rohan_P

‘महाराष्ट्र केसरी’ रोख रकमेपासून वंचितच

prashant_c

ग्रामीण भागात ज्ञानाच्या मशाली पेटत ठेवायला हव्यात : प्रा.सु.ह.जोशी

Rohan_P

सांगली : मिरजेत दोनशे वर्षांपूर्वी आला चहा; सन १७९९च्या पत्रात उल्लेख

Abhijeet Shinde

कर्तव्याला प्रथम प्राधान्य : एसडीएम सौम्या

Rohan_P
error: Content is protected !!