ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत काही कामगार जखमी झाले असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनी आहे. या कंपनीच्या प्लांटमध्ये आज सकाळी 11.30 च्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. धुराचे लोटच्या लोट हवेत उसळत असल्याने परिसरात काळोखी पसरली आहे. आगीची तीव्रता भीषण असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आगीत काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी काही कर्मचारी या आगीत अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक
घटनास्थळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत. बचाव व मदकार्याला वेग आला आहे.