पुणे / प्रतिनिधी :
पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रविवारी पुणेकरांची दाणादाण उडाली. पुणे शहरासह कोथरूड, आळंदी आदी भागांत अतिवृष्टी झाल्याने रस्ते जलमय होण्यासह अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अधूनमधून पाऊस होत आहे. आज दुपारनंतरही मेघ दाटून आले. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे रस्ते जलमय झाले, वाहने वाहून गेली, काही ठिकाणी भिंती खचल्या, तर घरात पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कोथरूडमध्ये पावसाची तीव्रता अधिक होती. या पावसाने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. काही घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले.
अधिक वाचा : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे
आंबेगावातील गायमुख ओढापूल परिसरात रस्ता पाण्याखाली गेल्याने चांदणी चौकाकडून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. हायवेवरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वेदभवन, कोथरुड, वनाजजवळ कचरा डेपो, लमाण तांडा, पाषाण, सोमेश्वर वाडी, वानवडी, कात्रज उद्यान या परिसरासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचल्याचे पहायला मिळाले. पावसाने पाषाण येथे एनसीएल जवळ, साळुंखे विहार, कोंढव्यात ज्योती हॉटेलजवळ, चव्हाणनगर येथे रुबी हॉलजवळ आणि पुणे स्टेशन परिसरात झाडे पडली. मात्र, यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही.
आळंदी परिसरातही पावसाचा राडा
आळंदी रस्त्यावरील दिघी येथेही ढगफुटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाण पाणी आले. पाण्याचा प्रवाह एवढा होता, की पूर आल्यासारखे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेली वाहने वाहून गेली.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, मुठा नदी पात्राशेजारील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशानाकडून देण्यात आल्या आहेत.