Tarun Bharat

गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले

  • मोपा विमानतळातील मातीपाणी घरे, शेती, मंदिरामध्ये
  • अनमोड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक रखडली
  • म्हापशात कोसळणाऱया दरडीत सापडून महिला जखमी
  • वास्को येथे साबांखाची भिंती कोसळून वाहनांची नुकसानी
  • डेंगरी – नावेली येथील 15 घरांना पाणी शिरल्याने फटका
  • दक्षिण गोव्यातील बहुतांश रस्ते, शेती गेली पाण्याखाली

राज्यभरात जनजीवन झाले विस्कळीत : नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ : अनेक ठिकाणी रस्ते, शेती पाण्याखाली

प्रतिनिधी / पणजी

गोव्याला काल सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पणजीसह सर्वत्र मुसळधार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती उद्भवली. सत्तरीतील म्हादई व इतर नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. म्हापसा व आसपासच्या परिसरातही तुफान पावसामुळे मोठय़ा प्रमाणात शेती पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. अनमोड घाटात दरड कोसळय़ाने वाहतूक ठप्प झाली. पेडणे तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. मोपा विमानतळ प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी खाली आल्याने आसपासच्या घरे, मंदिरांमध्ये, शेतीमध्ये पाणी घुसले. राज्यभरात सर्वत्र शेतीमध्ये लालमाती मिश्रीत पाणी उतरल्याने शेती धोक्यात आली.

कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम गोव्यावर झाला. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र अलिकडे मुसळधार पावसाचे इशारे देऊन देखील तशा पद्धतीने पाऊस पडला नाही. त्यामुळे यावेळीदेखील असा प्रकार होऊ शकतो हा सर्वसामान्य जनतेचा समज फोल ठरला आणि हवामान खात्याचा इशारा सत्यात उतरला. साधारणतः मध्यरात्रीनंतर 2.30 वा. पासून पावसाचे सर्वांनाच उग्र स्वरुप पाहायला मिळाले.

जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडतो त्याचा प्रत्यय आता जनतेला यायला लागला असून सोमवारी पावसाचा कहर झाला. सर्वत्र मुसळधार पावसाने गोव्याला झोडपून काढले. पहाटेपासून जोरदार पावसामुळे सत्तरी परिसरातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली व पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. सत्तरीतील अनेक रस्ते सकाळी पाण्याखाली गेले.

राजधानीचे वाजले तीन तेरा

राजधानी पणजीत पहाटेपासून सुरु झालेला पाऊस आणि त्यातच समुद्राला आलेल्या भरतीमुळे पणजीतील अनेक सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले. मिरामार सर्कलला तर पुराच्या पाण्याने वेढले. पाण्याची उंची एखाद्या व्यक्तीच्या कंबरेपर्यंत पोहोचेल एवढी होती. त्यात एका कारच्या तावदानापर्यंत पाणी पोहोचले. त्या परिसरातील वाहतूक वळवावी लागली. नेहमीप्रमाणे 18 जून रस्ता देखील पाण्याखाली गेला. महापालिका परिसर तसेच आत्माराम बोरकर रस्त्याचा बराचसा भाग हा पाण्याखाली गेला होता. वाहतूक वळवावी लागल्याने सकाळी कार्यालयात जाणारे कर्मचारी व तत्पूर्वी सकाळी शाळांमध्ये जाणाऱया विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणाऱया पालकांची धांदल उडाली. पावसाचा जोरच एवढा होता की, पुराचे पाणी पणजीतून ओसरायला सकाळचे 11 वाजले.

पाटो येथे महापूर

पाटो प्लाझा या ईडीसीच्या कार्पोरेट इमारतींच्या परिसरात पावसाचे पाणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात साचले की या परिसराला जवळपास महापुराचेच स्वरुप आले. दररोज हजारो मंडळी या परिसरात कामाला येतात. त्यांची त्रेधातिरीपीट उडाली.

संपूर्ण गोव्यात सर्वत्रच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. सत्तरीत सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस चालू होता. सत्तरीतील अनेक नद्यांमधील पाण्याची पातळी वाढून पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना सतर्क राहाण्यास सांगितले व सर्व नद्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. गेल्यावर्षी महापूर आल्याने सत्तरी, सांगे, डिचोली, धारबांदोडा या तालुक्यातील अनेक घरे वाहून गेली होती. त्यामुळे यंदा सरकार सतर्क राहिलेले आहे.

24 तासांतील पाऊस पेडणेने ओलांडले अर्धशतक

राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 5 इंच पाऊस सांगेमध्ये झाला. मडगाव व वाळपईत प्रत्येक 2.75 इंच, पेडणे 2.5 इंच, फोंडा, पणजी, सांखळी प्रत्येकी 2 इंच, दाबोळीमध्ये 1.5 इंच, जुने गोवे व काणकोण प्रत्येकी 1 इंच तर म्हापसा व मुरगावमध्ये पाऊण इंच पावसाची नोंद झाली होती. केपेनंतर आता पेडणेने देखील इंचाचे अर्धशतक सोमवारी ओलांडले.

पणजीत सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान 3.5 इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात आता 5 इंच पाऊस हा वार्षिक सरांसरीच्या तुलनेत अतिरिक्त झाला तर उत्तर गोव्यात देखील वार्षिक सरांसरी ओलांडून पाऊस पुढे पोहोचला. पणजीत यंदाच्या मौसमात 41 इंच पावसाची नोंद झाली.

आजही मुसळधार!

हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या इशाऱयानुसार, दि. 7 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र धो – धो पाऊस कोसळणार आहे. वाऱयाचा वेगही वाढत जाईल आणि सर्वत्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने 5 व 6 जुलैसाठी नारंगी अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचाही पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

Related Stories

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींची 5 रोजी सुनावणी

Amit Kulkarni

निवडणूक जवळ आल्याने जनतेला नुसती आश्वासने देऊ नका : खा. सार्दीन

Omkar B

मालपे-पेडणे येथे ट्रक उलटला

Amit Kulkarni

कवळे पंचायतीच्या प्रभागात गटार उपसा, जंतूनाशक फवारणी

Amit Kulkarni

भ्रष्टाचारात मंत्र्यांना स्वयंपूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

Amit Kulkarni

गोमंतक मराठा समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Amit Kulkarni