विमानसेवा प्रभावित : काही भागात गारपीट, वाहतूक कोंडी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीसह एनसीआरच्या अनेक भागात सोमवारी वादळी वाऱयासह पाऊस झाला. या पर्जन्यधारांमुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला असतानाच ठिकठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक भागात गाराही पडल्या. जोरदार वाऱयामुळे अनेक विमानांच्या वेळेवर परिणाम झाला आहे. वाऱयाचा झोत प्रचंड असल्याने पडझड होऊन वाहन-घरे यांचे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून शहरात उकाडय़ाने कहर केला होता. मात्र, सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे राजधानीतील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दुपारी चार वाजल्यापासून येथे मुसळधार पाऊस व वादळी वाऱयाची स्थिती निर्माण झाली होती. हवामान खात्याने आधीच हलका पाऊस आणि ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला होता. राजधानीत पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम विमानसेवांवरही झाला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही विमानफेऱया अन्यत्र वळविण्यात आल्या होत्या. खराब हवामानामुळे आठ उड्डाणे जयपूर, लखनौ, चंदीगड, अहमदाबाद, डेहराडूनकडे वळवण्यात आल्याचे दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.