प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूरसह परिसराला पावसाने पुन्हा जोरदार झोडपले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचे आगमन झाले. तब्बल दोन तासाहून अधिकवेळ पाऊस झाला. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. राजहंसगड व नंदिहळ्ळी रस्त्यावर झाड कोसळले. यावेळीच गर्लगुंजीकडे बस जात होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी या परिसरात जोरदार पाऊस झाला. वारा अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. पावसाच्या वेळीच गर्लगुंजी बस जात होती. यावेळी राजहंसगड गावाशेजारी असलेले एक झाड कोसळले, त्यावेळीच चालक डी. के. मळगली यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यामुळे बसमधील प्रवासी बचावले.
रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर काही तरुणांनी प्रयत्न करून झाड बाजूला केले. यापूर्वीही येळ्ळूर रस्त्यावर अनेक झाडे कोसळली होती. सुळगा परिसरातही झाडे कोसळली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वळीव पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हेस्कॉमचे विद्युतखांब कोसळून नुकसान झाले आहे. याचबरोबर झाडे आणि भाजीपाल्याचे देखील नुकसान होत आहे. या वळीव पावसाने यावषी साऱयांचीच तारांबळ उडविली आहे.