झाडांची पडझड : सर्वत्र पाणीच पाणी : वाहतुकीतही काही प्रमाणात अडथळा
प्रतिनिधी /डिचोली
गेल्या अनेक दिवसांपासून लहरीपणे पडणारा पाऊस गेले दोन दिवस जोरदार कोसळत आहे. यामुळे सर्वत्र पाणीचपाणी होऊन डिचोली तालुक्मयात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी झाडांची पडझड आली. डिचोली अग्निशामक दलाने सदर ठिकाणी त्वरित बचावकार्य हाती घेतले. या पावसामुळे सर्वत्र थंडावा निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱयांच्या कामाला वेग आला आहे.
मान्सून अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर पावसाला तसा समाधानकारक जोर नव्हता. मात्र गेले दोन दिवस पावसाने बराच जोर धरला आहे. त्यामुळे लोक सुखावले आहे. पावसाळा सुरू होऊनही पाऊस नियमित नसल्याने उकाडा सुरूच होता. पण दोन दिवस जोरदारपणे पावसाचा मारा सुरूच असल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन लोकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला आहे.
जोरदार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. नगरपालिका तसेच पंचायत क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे झालेली आहेत. तरीही काही भागांमध्ये पाणी साचून राहते. त्याचा त्रास लोकांना होतो. काही गटरांमध्ये माती व कचारा तुंबल्याने पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर माती व कचरा दिसत आहे.
दोन दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे हाऊसिंग बोर्ड सांखळी येथे महालक्ष्मी मंदिराजवळ रस्त्यावर माड पडल्याने काही काळ या रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेत माड हटविला आणि रस्ता मोकळा करून दिला. तसेच डॉ. स्वप्ना हुबळीकर यांच्या घरावर पडलेल्या झाडामुळे त्यांचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. फ्रान्सिस ब्रागांझा यांच्या घरावर झाड पडल्याने, त्यांचे सुमारे 10 हजारांचे नुकसान झाले. या ठिकाणीही डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन बचावकार्य केले.