Tarun Bharat

‘मृगा’च्या मुहूर्तावर रत्नागिरीत पावसाची जोरदार ‘एन्ट्री’

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गेल्या अनेक दिवसांपासून आभाळ पावसाच्या ढगांनी दाटून येऊनही पाऊस मात्र कोसळत नाही, अशी जिल्ह्य़ात स्थिती होती. मात्र मृग नक्षत्रावर म्हणजेच 8 जून रोजी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने दणक्यात हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला असून आबालवृध्दांपर्यंत प्रत्येकजण आनंदला आहे. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातही वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील मुरडव मेणेवाडी येथे सायंकाळी 5 च्या सुमारास वीज कोसळण्याचा प्रकार घडला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेने 2 कोंबडय़ा मृत झाल्याची माहिती देवरुख तहसील कार्यालयातून प्राप्त झाली.

  गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस कधी येणार, याचा अंदाज बांधला जात होता. मात्र सततचा उकाडा व पावसाची हुलकावणी गेले काही दिवस सारेच अनुभवत होते, मात्र मान्सूनच्या प्रत्यक्ष आगमनापूर्वी पडलेला पाऊस बुधवारी रत्नागिरीकरांना सुखावून गेला आहे. मृग नक्षत्राच्या शुभारंभाला पडलेल्या या पावसाने साऱयांचीच त्रेधातिरपीट उडाली. हवामान विभागानुसार, मान्सून सध्या कर्नाटकात रेंगाळला आहे. नवीन अंदाजानुसार मान्सून 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात येणार आहे. आज महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, अशा हवामान खात्याच्या वारंवार इशाऱयांनी नागरिकही बुचकाळय़ात पडले होते. नेमका मान्सून कधी येणार, याची प्रतीक्षा लागली आहे. केरळात नैऋत्य मोसमी वाऱयांचे आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

  वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाजही चुकला आहे. आता 12 ते 13 जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी नवीन माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वत्र पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

 पुढील 5 दिवस कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिण कोकणात पूर्वमोसमी पावसाची गरज असते. यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होते. पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती मान्सूनच्या आगमनासाठी फायदेशीर ठरणार आहे. हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांना पिवळा इशारा जारी केला आहे. पुढील काही तासात येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

       देवरूखसह संगमेश्वरात मुसळधार

देवरूखः देवरुखसह संगमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. तालुक्यातील मुरडव मेणेवाडीत वीज कोसळण्याचा प्रकार घडला. सुदैवाने कोणीही जखमी झालेला नाही. मात्र या घटनेने 2 कोंबडय़ा मृत झाल्याची माहिती देवरुख तहसील कार्यालयातून मिळाली आहे. बुधवारी सायंकाळी अचानक 5 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार एन्ट्री केली. 1 तास पावसाची संततधार सुरू होती. मुरडव मेणेवाडी येथे रवींद्र नारायण नावले यांच्या घरावर वीज कोसळण्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु 2 कोंबडय़ा मृत झाल्या आहेत.

Related Stories

‘गावठी’च्या वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Patil_p

रत्नागिरी : प्रेक्षकाविना चित्रपटगृहे ओस

Archana Banage

आता खासगी वाहनांसाठी एसटीचे पेट्रोल पंप

NIKHIL_N

आरजीपीपीएल प्रशासन व कंपनी कामगारांमध्ये बायोमेट्रिक थम्सवरून वाद

Archana Banage

परवाना अधिकाऱयावर कारवाई करा

NIKHIL_N

कार – बोलेरोची समोरासमोर धडक

NIKHIL_N
error: Content is protected !!