Tarun Bharat

देशात परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ

अर्चना माने-भारती / प्रतिनिधी

यंदाच्या मान्सूनचा हंगाम सप्टेंबरअखेर संपला असला, तरी परतीच्या पावसाने ऑक्टोबरमध्ये देशाला अक्षरश: झोडपून काढले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 1 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या कालावधीत तब्बल 16 राज्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर सहा राज्यांमध्ये अतिरिक्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातही पावसाचे झोडपसत्र सुरू असून, या भागात अतिरिक्त पाऊस नोंदवण्यात आला आहे. गोव्यात मात्र पावसाचे अवर्षण दिसून येत आहे.

साधारणत: सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा देशातील प्रवास संपला आहे. 17 सप्टेंबरला वायव्य भारतातून मान्सून माघारीस निघाला. आतापर्यंत तो गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतून माघारी फिरला आहे. मात्र, यादरम्यान बंगालचा उपसागर तसेच भारतीय भूभागावर निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे देशभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीचा मान्सूनही जाता-जाता पावसाचे दान देत असतो. त्याप्रमाणेच तो बरसत आहे. मात्र, यंदा सर्वसाधारण मान्सूनही सरासरीपेक्षा जास्त झाल्याने आणि त्यातच परतीच्या पावसाने झोडपल्याने अनेक भागांत ओला दुष्काळ पसरला आहे. ऑक्टोबर महिन्यातच तब्बल 16 राज्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात हिमाचल प्रदेश (सरासरीच्या 159 टक्के अधिक), पंजाब (90), उत्तराखंड (487), राजस्थान (330), हरियाणा (530), दिल्ली (601), उत्तर प्रदेश (616), बिहार (108), झारखंड (73), मध्य प्रदेश (293), ओरिसा (66), आंध्र प्रदेश (72), सिक्कीम (217), अरुणाचल प्रदेश (86), आसाम (95), त्रिपुरा (सरासरीच्या 61 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे) या राज्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा : लटकेंचा अंधेरी पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा; पालिकेने राजीनामा स्वीकारला

सहा राज्यांत अतिरिक्त पाऊस

सरासरीपेक्षा अधिक पण अतिवृष्टीपेक्षा कमी पाऊस झालेल्या राज्यांमध्ये 6 राज्यांचा समावेश आहे. यात गुजरातमध्ये सरासरीच्या 50 टक्के, तेलंगणा सरासरीच्या 35, छत्तीसगड सरासरीच्या 44 टक्के, पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या 55 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकतही अतिरिक्त पाऊस, गोव्यात अवर्षण

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र तसेच कर्नाटकात अतिरिक्त पाऊस झाला आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 13 ऑक्टोबरपर्यंत 46.1 मिमी इतका पाऊस होतो. पण प्रत्यक्षात 73.5 मिमी पाऊस पडला असून, सरासरीच्या 59 टक्के अधिक पाऊस झाला आहे. कर्नाटकात 70 मिमी इतका पाऊस होतो, पण प्रत्यक्षात 101.8 मिमी इतका पाऊस झाला असून, सरासरीच्या 45 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. गोव्यात पावसाची स्थिती नियंत्रणात असून, येथे ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या उणे 72 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.

ईशान्य मोसमी पाऊसही दमदार बरसणार

दरम्यान, दक्षिणेच्या भागात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीत कोसळणारा ईशान्य मोसमी पाऊस यंदा दमदार होण्याचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

परतीच्या मान्सूनला मिळणार चालना

परतीचा मान्सून वायव्य तसेच उत्तरेकडील काही भागातून बाहेर पडला आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत तो महाराष्ट्राच्या काही भागातून माघारी फिरेल. 15 ऑक्टोबरपर्यंत कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल.

Related Stories

आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो

datta jadhav

सचिन वाझेंना हृदयविकाराचा त्रास; खासगी रूग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

Tousif Mujawar

कराडात कुरिअर बॉयला दीड लाखांचा गंडा

Patil_p

मनोहर भोसले याच्यासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Archana Banage

पाचगणी नगरपालिकेला नॅशनल टुरीझम अवॉर्ड

Patil_p

वाई बाजार समितीचा भाजीपाला थेट जनतेच्या दारात

Patil_p