12 ऑगस्टपर्यंत लेमन अलर्ट : वादळी वाऱयासह पावसाची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे. आगामी 24 तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून दि. 12 ऑगस्टपर्यंत राज्यात लेमन अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे आहेत.
सोमवारी राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. काही भागात मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पणजीत जोरदार वाऱयासह अधूनमधून पाऊस चालू होता. आंध्रप्रदेश व ओडिसा दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव अरबी समुद्रावर पडू शकतो व त्यातून किनारी भागात विशेषतः गोवा व कोकणमध्ये सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला.
सत्तरी व डिचोली तालुक्यात रविवारी रात्री सुरु झालेला पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत चालू होता. गेल्या 24 तासात वाळपईमध्ये सव्वा इंच व सांखळीतही सव्वा इंच पावसाची नोंद झाली. पेडणे, जुने गोवे येथे प्रत्येकी पाउण इंच, पणजी, काणकोण, दाबोळी, मडगाव, मुरगाव व सांगे येथे अर्धा इंच पावसाची नोंद झाली. दि. 10 ते 12 ऑगस्ट या दरम्यान गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. रविवार व सोमवार या दोन्ही दिवसांमध्ये दिवसभर ढगाळ हवामान होते. ओडिशा व आंध्र दरम्यान वादळ सदृष्य स्थिती निर्माण झाल्याने गोव्यात देखील पावसाबरोबर जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ताशी सुमारे 55 कि.मी. या वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे.