चंदगड(कोल्हापूर) : चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरात सोमवार दि.११ रोजी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज दिवसभर असाच पाऊस सुरू राहीला तर दोन दिवसांत पूर येण्याची शक्यता आहे.यामुळे कोवाड बाजार पेठेतील व्यापारी वर्ग धास्तावला आहे.
२०१९ च्या महापुराने कोवाडकरांची अक्षरशः दैना उडाली होती. या महापुरात जवळपास पन्नास घरे जमीनदोस्त झाली होती. सतत कोसळणारा धो धो पाऊस यामुळे बाजार पेठेत रात्रीच्या वेळी आकस्मिक पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर २०२१ साली ही महापूराने मोठा दणका दिला होता. गेला आठवडाभर या परिसरात रिमझिम पाऊस होता. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने कोवाड येथील ताम्रपर्णी नदी तुडुंब भरली आहे.
आज सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू असल्याने महापुराच्या शक्यतेने व्यापारी वर्ग धास्तावला आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने जुन्या पुलावरील धरणाच्या भिंतीजवळील नदीतून आलेले लाकडाचे ओंडके, आणि कचरा जेसीबी च्या सहाय्याने दुर केले. जुन्या पुलावरील वाहतुक बंद केली. तर दीड महिन्यापूर्वी नोटिसद्वारे सर्वाना पुराविषयी स्थलांतर होण्यासाठी कळवले आहे. श्री राम विद्यालय ,आश्रम शाळा, आणि मराठी शाळा आरक्षित केल्या आहेत. तलाठी राजश्री पचंडी या सतत नदी काठावर लक्ष ठेवून आहेत. रविवारी तहसीलदार विनोद रनवरे यांनी ताम्रपर्णी नदी पात्राची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत .

