Tarun Bharat

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर

Advertisements

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला प्रारंभ होतो आणि जुलैमध्ये बऱयाच भागात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रत्यय येतो. ऑगस्ट महिना आला की पावसाचा जोर कमी होऊ लागतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाच्या संकटामुळे लहरी मान्सून महाराष्ट्रातील बऱयाच भागात शेती, बागायती पिकांबरोबर मालमत्तेच्या प्रचंड नुकसानीस कारण ठरत असतो, त्याचप्रमाणे जिवितहानीचे प्रमाणही दरवर्षी लक्षणीय ठरत असते. यंदा जूनमध्ये मान्सूनला सुरूवात झाली आणि ऑगस्टातही पर्जन्यवृष्टीचा जोर चालू असून, महापूर आणि तत्सम संकटांमुळे शंभरच्यावर ठिकठिकाणी महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडलेले आहेत. ऊन-पावसाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रावणातही धुवांधार पर्जन्यवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील जनतेला असंख्य संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. सध्या कोल्हापुरात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवलेली असून, राधानगरी आणि अन्य धरणांचे दरवाजे खुले केल्याने पूरक्षेत्रातील स्थानिकांचे स्थलांतर करावे लागलेले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱया पावसामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत असल्याने, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे.

अतिवृष्टीमुळे बऱयाच मार्गावरची सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असून, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला आपल्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील वाहतूकसेवा अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीपायी विस्कळीत झालेली आहे. गेल्या काही दिवसांमागे कडक उन्हाचा तडाखा महाराष्ट्रातील बऱयाच भागाला बसला होता. परंतु सध्या मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरापासून ते आंध्रप्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील बऱयाच ठिकाणची शेती अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकऱयांच्या तोंडचे पाणी गायब होण्याची परिस्थिती उभी राहिली आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके मदतकार्यात गुंतलेली असून, मनुष्यहानीबरोबरच पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडण्याबरोबर घरे आणि इमारतींची मोठय़ा प्रमाणात पडझड झाल्याने कोटय़वधी रुपयांची नुकसानी झालेली आहे. सध्या अतिवृष्टीचा कहर विदर्भासह, मराठवाडा, कोकण आणि घाटमाथ्यावरच्या गावांना सोसावा लागत असून, त्यामुळे आपत्तीग्रस्त लोकांना मदत करताना आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांना बराच संघर्ष करावा लागत आहे. हवामान खात्याच्या यंत्रणेमार्फत ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या अतिवृष्टीबाबत पूर्वसूचना देण्यात आल्याकारणाने बऱयाच ठिकाणच्या स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आपत्ती प्रतिसाद दलाची पथके यशस्वी ठरलेली आहेत.

मान्सूनमध्ये अतिवृष्टी झाली तर मुंबई जलमय होणे आणि तेथील दैनंदिन जीवनाला महामार्ग, रेल्वेमार्ग बंद झाल्यावर फटका बसणे ही बाब काही नवी राहिलेली नाही. महाराष्ट्राची राजधानी म्हणूनच नव्हे तर एकंदर झपाटय़ाने वाढणाऱया लोकसंख्येमुळे आणि त्याच्यासाठी उभारल्या जाणाऱया घरे, झोपडपट्टय़ा, साधनसुविधा यांच्या विस्तारापायी अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याला वाहून नेणाऱया गटारे, ओहोळ, नाले यासारख्या जलस्रोतांची स्थिती अत्यंत दुर्बल झालेली आहे. महाराष्ट्रातील सध्या 28 जिल्हय़ातील शेकडो गावांना अतिवृष्टीमुळे जबरदस्त फटका बसलेला असून, पूरग्रस्तांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आलेले आहे. नागपूर विभागातील गडचिरोली जिल्हय़ातील वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती या नद्या धोक्याच्या पातळीच्यावर वाहत असल्याने, शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. अतिवृष्टीचा तडाखा महाराष्ट्रासारख्या राज्याला वारंवार बसत असून, गेल्यावर्षी अतिवृष्टी, भूस्खलनाच्या उद्भवलेल्या घटनांत शेकडो लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. 2017 साली ‘नेचर’ पत्रिकेत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात 1950 आणि 2015 या कालावधीत मध्यभारतात अतिवृष्टीच्या घटनांत तीनपट वृद्धी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. यंदा देशात पाऊस चांगला होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच दिली होती. महाराष्ट्रातील सर्व भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीचा व्यक्त केलेला अंदाज सत्य ठरत आहे. मे-जून महिन्यात सर्वसाधारणपणे भारतीय द्विकल्पात उन्हाळा उष्ण असतो तेव्हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आसपासचे तापमान तुलनेने कमी असते. तापमानाच्या या फरकामुळे समुद्रातील पाण्याचे ढग मोठय़ा प्रमाणात जेथे सरकतात तेथे मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी होत असते. सध्या निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे महाराष्ट्रातील बऱयाच भागाला अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.

गेल्या काही वर्षापासून मान्सूनमध्ये होणाऱया पर्जन्यवृष्टीत लहरीपणा आलेला असून, महाराष्ट्रातील काही भागांना अतिवृष्टीचा वारंवार फटका बसत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आगामी काळात मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीतील लहरीपणा वाढणार असल्याने, ढगफुटीसारख्या प्रकारांनी महाराष्ट्रातील काही गावांना तर नेस्तनाबूत केलेले आहे. आज अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओहोळासारख्या जलस्रोतांची पावसाळी पाणी वाहून नेताना बिकट स्थिती झालेली आहे. शहरात सांडपाणी, पावसाचे पाणी वाहून नेणाऱया गटारात केरकचरा घुसल्याने अतिवृष्टीप्रसंगी पाणी, रस्ते, रेलमार्गावर येऊन वाहतुकीला अडथळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. प्लास्टिक आणि तत्सम कचऱयाचे व्यवस्थापन करण्याऐवजी तो मिळेल तेथे टाकल्याने गटारे तुंबलेली आहेत आणि त्यामुळे अतिवृष्टीप्रसंगी एकंदर लोकजीवनाला असंख्य दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांच्या उगम ज्या घाटमाथ्यावरच्या प्रदेशात होतो तेथील जलसंचय क्षेत्रातील वृक्षाच्छादनाचे सुरक्षाकवच कधीच उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. जंगली स्थानिक वृक्षवेलींची तोड करून त्याजागी विदेशी वनस्पतींची लागवड करण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. ज्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी जलसिंचन, पेयजल आणि विद्युतनिर्मितीसाठी धरणांची साखळीच निर्माण करण्यात आलेली आहे, त्या धरणांच्या जलशयांची दुरवस्था प्रकर्षाने अतिवृष्टीप्रसंगी पाणी धारण करण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाल्याने प्रकाशात आलेली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने जलाशय तुडुंब भरल्यावर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे आजघडीस अतिपर्जन्यवृष्टीत महापुराचे गंभीर दुष्परिणाम स्थानिकांना भोगावे लागत आहेत. जगभरात आज मोठय़ा धरणांच्या बांधकामांना टाळून, वसंत बंधारे आणि जलसंचयाच्या अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. धरणांच्या जलाशयाला वेढून असलेल्या जंगलांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने उपाययोजना राबविलेली नसल्याने दरवर्षी अतिवृष्टीमुळे महापूर, भूस्खलन आदी संकटांची मालिका वार्षिक झालेली आहे. निसर्ग आणि पर्यावरणासंदर्भात गेल्या पन्नास वर्षात सरकारी पातळीवर ज्या चुका झालेल्या आहेत, त्याची कडू-गोड फळे त्यामुळे अतिवृष्टीच्या कहरात सर्वसामान्य नागरिकांच्या वाटय़ाला येत आहेत आणि त्यासाठी हवामान बदलाचा वेध घेऊन नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.

– राजेंद्र पां. केरकर

Related Stories

वाढत्या रुग्णसंख्येची डोकेदुखी

Patil_p

कुरापतखोर चीन

Patil_p

नाग्याची व्यसनमुक्ती

Patil_p

मुंडेना तुर्तास अभय

Patil_p

पक्षांतराचे पर्व अन् लोकायुक्तांची पर्वा

Amit Kulkarni

अतिवृष्टी, पूर, कोरोनाचे संकट आणि राजकीय हेवेदावेही

Patil_p
error: Content is protected !!