महामार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण पुन्हा सुरू
प्रतिनिधी /वाळपई
गोवा ते बेळगाव जाणाऱया चोर्ला महामार्गाच्या दुरुस्तीस पुन्हा सुरुवात झाली आहे. काल सोमवारपासून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येत असून दि. 4 ते 11 मे याकालावधीत सदर मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आलेली आहे.
या महामार्गाची गोवा हद्दीमध्ये पूर्णपणे वाताहत झाली आहे. यामुळे या रस्त्याचे जवळपास नऊ कोटी खर्चून डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र ज्या कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम घेतले होते त्याने काम करताना निष्काळजीपणा केला होता. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे बनले होते. कंत्राटदाराच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग व्यवस्थापनाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळे गोवा सरकारने दोन अधिकाऱयांचे निलंबन केले आहे.
पंधरा दिवस चालणार डांबरीकरण
येत्या महिन्याभरात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सदर रस्त्याच्या डांबरीकरण कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात वाळपई वाहतूक पोलिस अधिकऱयांनी सांगितले, की सरकारी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मार्गावर अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात येणार नाही. जबरदस्तीने वाहतूक करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.