वृत्तसंस्था/ गुवाहटी
अरुणाचल प्रदेशच्या सियांग भागात शुक्रवारी भारतीय सेनेचे हेलिकॉप्टर कोसळुन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून प्राथमिक अनुमानानुसार हा अपघात हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्यावेळी हवामान चांगले होते. हेलिकॉप्टर उडविणारे चालक अनुभवी असून त्यांना एकंदरीत 600 तास उड्डाणाचा अनुभव होता. तरीही हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी चालकांनी नियंत्रण टॉवरला संदेश पाठवला होता. या संदेशात तांत्रिक बिघाड होत असल्याचे म्हटले होते.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून घोषित करण्यात येतील. या दुर्घटनेतील पाचवा मृतदेह शनिवारी हाती लागला. घातपाताची शक्यता फेटाळण्यात आली असली तरी चौकशी सर्व बाजूंनी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर अपघाताचे खरे कारण समोर येईल, असे सेनेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.