आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना ः 20 वर्षांत 1000 हून अधिक हेलिकॉप्टर बनवणार
बेंगळूर / प्रतिनिधी
आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना कर्नाटकातील तुमकूरमध्ये साकारण्यात आला आहे. सोमवार, 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एचएएल’चा हा हेलिकॉप्टर कारखाना देशाला सुपूर्द करतील. हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना असून हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि इको-सिस्टम वाढवणार असल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. दरम्यान, 6 फेब्रुवारीलाच पंतप्रधान बेंगळूरमध्ये ‘इंडिया एनर्जी वीक-2023’ चे उद्घाटन करतील. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही परिषद चालणार आहे.
तुमकूरस्थित हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना 615 एकर क्षेत्रात विस्तारलेला असून येथे सुरुवातीला लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच) (हलक्या वजनाची हेलिकॉप्टर्स) तयार केली जातील. ‘एलयुएच’ हे स्वदेशी बनावटीचे आणि 3-टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. सुरुवातीला या कारखान्यात दरवषी सुमारे 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर दरवषी त्याची क्षमता 60 ते 90 हेलिकॉप्टर अशा प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील 20 वर्षात येथे 4 लाख कोटींची उलाढाल असलेली 1000 हून अधिक हेलिकॉप्टर बनवली जाणार असल्याचेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
कर्नाटकातील 6000 लोकांना रोजगार
‘एलयुएच’नंतर येथे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (आयएमएच) तयार करण्याची योजना आहे. याशिवाय एलसीएच, एलयूएच, सिव्हिल एएलएच आणि आयएमआरएचचीही दुरुस्ती केली जाणार आहे. या कारखान्यातून राज्यातील सुमारे 6,000 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. याशिवाय कारखाना सुरू झाल्याने आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणार आहे.