मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची घोषणा
प्रतिनिधी /म्हापसा
गोव्यातून आता शिर्डी, कोल्हापूर, पुणे, बेळगाव या दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कांदोळी येथे हेलिपेडवर बोलताना केली.
हेलि-टय़ुरिझममुळे आम्हाला गोव्याच्या अंतराळ प्रदेशाचा शोध घेता येईल. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार अशा उपक्रमांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य देईल, असे सांगून ब्लेड इंडिया एव्हिलेशनने अशी सेवा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ब्लेड इंडिया कंपनीकडून गोव्यातील पर्यटनाला जमिनीपासून ते आकाशपर्यंत भरारी देण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केल्यानंतर पंचतारांकित ताज हॉटेलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
राज्यातील पर्यटन व्यवसायास चालना देण्यासाठी ब्लेड-इंडिया सिकेरीतील आग्वाद किल्ल्याच्या पठारावर डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर सेवा लाँच करण्यात आली. यावेळी ब्लेड इंडियाचे करणपाल सिंग उपस्थित होते.
आपत्कालीनसाठी सेवा फायदेशीर ठरेल
कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर लवकरच या हेलिराईड सेवेची नियमित स्तरावर सुरुवात होणार आहे. राज्याला भेट देणाऱया पर्यटकांबरोबरच ही हेलिकॉप्टर सेवा आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अंतराळातून गोवा अतिसुंदर दिसतो
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुमारे 15 मिनिटे हॅलिकॉप्टरने सफर केली. कांदोळी हेलिपॅडवर उतरल्यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हेलि टय़ुरिझममुळे आम्हाला गोव्याच्या अंतराळ प्रदेशाचा शोध घेता येईल. गोवा हा खूप सुंदर आहे आणि अंतराळातून अतिसुंदर दिसतो. हेलिकॉप्टर सेवेमुळे आपत्कालीन सेवेसाठीही खूप फायदा होईल. मार्गाने वाहतूक करण्यापेक्षा हवाईने अंतर जलद कापता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.