8 वर्षांपासून करतेय पालनपोषण, माकडांसाठी घरदार सोडून दिले
उत्तरप्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये सध्या भीषण उष्णतेने प्रत्येक जण व्याकुळ आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नद्या-तलाव कोरडे पडू लागले असून प्रत्येक जण पाणी मिळविण्यासाठी धडपड करतोय. पशूपक्ष्यांनाही जंगालत पाणी न मिळाल्याने ते नागरी वस्तीच्या दिशेने धाव घेत आहेत. बुंदेलखंडमधील पाण्याचे संकट दूर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आता उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या जंगलांमध्ये पाणी न मिळाल्याने वन्यजीव संकटात सापडू लागले आहेत.
हेच पाहात एका वृद्ध महिलेने एक उत्तम पुढाकार घेतला आहे. कटरा येथे राहणाऱया 60 वर्षीय वृद्ध महिला रानी उर्फ कुशमा या मागील अनेक वर्षांपासून बागै नदीनजीक एका ठिकाणी झोपडी तयार करून राहत आहेत, भीषण उष्णतेदरम्यान स्वतःला पूर्णपणे झोकून देत प्राण्यांची सेवा करत आहेत.
उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील जंगलांमध्ये असलेली माकडं पाण्याअभावी संकटात सापडू नयेत म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हँडपंपने पाणी प्यायला देता कुशमा या माकडांना त्यांना ठेवलेल्या नावांनी हाक मारून बोलावतात. हा आवाज ऐकून ही माकडं हँडपंपवर येतात आणि पाणी पिऊन परत जंगलात जातात.
प्रचंड उष्णतेदरम्यान प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वृद्ध महिला हँडपंप चालवत असतात. घनदाट जंगलांमध्ये कोरडे होत चाललेल्या जलस्रोतांदरम्यान माकडं याच हँडपंपद्वारे स्वतःची तहान भागवतात. सुमारे 8 वर्षांपासून कुशमा यांनी हे कार्य सुरू केले आहे. आपण जिवंत असेपर्यंत हे कार्य सुरुच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लोक देखील करतात मदत
वृद्ध महिलेचे कुटुंब कालिंजर क्षेत्रातील कटरा येथे राहते. मला 4 मुले असून काही दिवसांपूर्वी यातील एका मुलाचा मृत्यू झाला आहे. गावात माझे तिन्ही मुलगे स्वतःच्या कुटुंबांसोबत राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु कुशमा यांनी स्वतःचे वास्तव्य मात्र जंगलातच ठेवले आहे. कुटुंबातील लोक त्यांना तेथे येऊन भेटत असतात. तेथील माकडांना देखील कुशमा यांचा लळा लागल्याने त्यांच्या झोपडीत येऊ लाकले आहेत. कुशमा यांना लोक अन्न पुरवत असतात. कुशमा आता उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. लोक त्यांच्या या परोपकाराचे तोंडभरून कौतुक करत आहेत.