वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने मंगळवारी भारतीय कनिष्ठ पुऊष आणि महिला हॉकी संघांचे प्रशिक्षक म्हणून दोन दशकांहून अधिक काळाचा प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या हर्मन क्रूस यांची नियुक्ती जाहीर केली आहे. भारतातील त्यांच्या कार्यकाळात ते या वर्षाच्या शेवटी मलेशियामध्ये होणार असलेली पुऊष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा आणि सांतियागो येथे होणार असलेल्या महिला कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या आधी भारतीय कनिष्ठ पुऊष आणि महिला संघाकडून केल्या जाणार असलेल्या तयारीवर देखरेख करतील.
नेदरलँड्सच्या क्रूस यांना प्रशिक्षणाचा अफाट अनुभव असून डेन बॉश या नेदरलँड्सबाहेरील क्लबच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात सदर संघाने सलग आठ वेळा युरोपियन कप जिंकला होता. 2006 ते 2008 दरम्यान ते नेदरलँड्सच्या इनडोअर महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि 2008 ते 2010 दरम्यान नेदरलँड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले होते, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. क्रूस यांच्या सर्वांत अलीकडील कार्यकाळात 2016 ते ऑगस्ट, 2023 या कालावधीत त्यांनी बेलारूस इनडोअर आणि आउटडोअर संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
‘हॉकी इंडिया’ला प्रतिष्ठित वरिष्ठ प्रशिक्षक हर्मन क्रूस यांचे आमच्या कनिष्ठ संघांच्या राष्ट्रीय कार्यक्रमात स्वागत करताना आनंद होत आहे. ते कनिष्ठ पुऊष आणि महिला संघांच्या सुरू असलेल्या तयारीचे निरीक्षण करतील. मला विश्वास आहे की, त्यांच्या अनुभवामुळे कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आमच्या संधी आणखी वाढतील. ते भारताच्या कनिष्ठ महिला संघाचे प्रशिक्षक तुषार खांडकर आणि कनिष्ठ पुऊष संघाचे प्रशिक्षक सी. आर. कुमार यांच्यासोबत काम करतील, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितले आहे. हॉकी इंडियासोबतच्या आपल्या नव्या भूमिकेसाठी आपण उत्सुक आहे, असे क्रूस यांनी म्हटले आहे.