सर्वोच्च कमांडरच्या मृत्यूनंतर हल्ला, अलिकडेच दिली होती युद्धाची धमकी
वृत्तसंस्था /लेबनॉन
इराण समर्थक संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. दहशतवादी संघटनेने गुऊवारी ज्यू देशावर 200 हून अधिक रॉकेट डागली. याशिवाय जवळपास 20 ड्रोन हल्लेही करण्यात आले आहेत. या हल्ल्यात इस्रायलच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. प्रदेशातील वाढत्या तणावादरम्यान अनेक देशांनी आपल्या नागरिकांना लेबनॉनला जाण्यापासून सावध केले आहे. हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाह याने इस्रायली विमानतळ आणि सायप्रसवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
लेबनॉनमधून काही क्षेपणास्त्रे त्यांच्या हद्दीत पडल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. यापैकी काही क्षेपणास्त्रे पाडण्यात यश आले आहे. या हल्ल्यात अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. हिजबुल्लाहने आपल्या एका प्रमुख कमांडरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे मानले जात आहे. इस्रायलने बुधवारी दक्षिण लेबनॉनमधील एका शहरावर हल्ला केला. यामध्ये हिजबुल्लाचा टॉप कमांडर मुहम्मद निमाह नासिर (हज अबू निमाह) मारला गेला. हिजबुल्लाहनेही कमांडरच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी आयडीएफ हिजबुल्लाहविऊद्ध कोणतीही कारवाई करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.
ड्रोन हल्ल्यानंतर गोलन हाइट्समध्ये आग
हिजबुल्लाहकडून हल्ला सुरू होताच गोलान हाइट्समध्ये आग लागली. यानंतर बचाव कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच गाझा सीमेजवळील नहल ओझ परिसरात सायरन वाजू लागले. सध्या अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
लेबनॉनशी युद्धाची शक्यता
इस्रायलमध्ये आणखी एका आघाडीवर युद्धाची शक्मयता आहे. हिजबुल्लाहचे हल्ले वाढल्यानंतर उत्तर इस्रायलमधील अनेक भाग रिकामे करण्यात आले आहेत. तेथील लोकांना दक्षिण इस्रायलमधील हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. हिजबुल्लाहच्या मोठ्या हल्ल्याचा अंदाज घेऊन इस्रायलींनी आपल्या घरातील बंकरमध्ये अन्न, पाणी आणि इतर वस्तू साठवण्यास सुऊवात केली आहे.