भाजप नेते, बग्गा, कुमार विश्वासांवरील एफआयआर रद्द
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला मोठा झटका बसला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिल्लीतील भाजप नेते तेजिंदर बग्गा तसेच प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्याविरोधात नोंद एफआयआर रद्द केला आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी यासंबंधी निर्णय दिला आहे.
बग्गांनी हे ट्विट पंजाबमध्ये येत केलेले नाहीत तसेच त्यांचे ट्विट प्रक्षोभक नाहीत. राजकीय लोक परस्परांच्या विरोधात विधाने करत असले तरीही त्यामुळे कुठलाही तणाव निर्माण होत नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कुमार विश्वास यांच्यावर रोपडमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. विश्वास यांनी अरविंद केजरीवालांना खलिस्तान समर्थक संबोधिल्याचा आरोप होता. तसेच विश्वास यांच्या विधानामुळे आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा दावा करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यावर पंजाब पोलीस पथक कुमार विश्वास यांच्या गाजियाबाद येथील निवासस्थानात पोहोचले होते. त्यांना नोटीस बजावून चौकशीत सामील होण्यास सांगितले होते. याच्या विरोधात कुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दिल्लीतील भाजप नेते तेजिंदर बग्गा यांच्यावर केजरीवाल यांच्यासंबंधी ट्विट करण्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी दिल्लीत जात बग्गा यांना अटक केली होती. याच्या विरोधात बग्गा यांच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांकडे अपहरणाची तक्रार केली होती. दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. यानंतर बग्गा यांना नेत असलेल्या पंजाब पोलीस पथकाला हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रात रोखले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना ताब्यात घेत दिल्लीत आणून सोडले होते. याप्रकरणी बग्गा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.