प्रतिनिधी / बेळगाव
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज येथे सर एम. विश्वेश्वरय्या बँक्वेट हॉल व हायब्रिड लर्निंग स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेने सर्व वर्ग व स्टुडिओही डिजीटल उभारला आहे. मराठा मंडळ हे देशातील पहिले कॉलेज आहे, जेथे हायब्रिड लर्निंग स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. याबरोबरच देश आणि विदेशातील प्राध्यापक विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकणार आहेत.
याच्या उद्घाटनप्रसंगी उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी, आज तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले असून विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगितले. व्हीटीयूचे कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर यांनी अशा हायब्रिड शिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे, असे सांगितले.
विधानपरिषद सदस्य नागराजू यादव यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहाचे उद्घाटन केले. सरकारने बेंगळूरच्या पलीकडे बेळगावला सुविधा द्यायला हव्यात, असे सांगितले. संस्थाध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांनी अध्यक्षीय भाषणात मराठा मंडळने डिजीटल क्रांती केली आहे. विद्यार्थ्यांना कोठेही, कधीही, केव्हाही अभ्यास करणे शक्य होणार आहे, असे सांगितले.
यावेळी अलिसेठ यांनी हायब्रिड सिस्टीमचे प्रात्यक्षिक दाखविले. प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी स्वागत केले. स्वाती पाटील, प्रा. चेतना भागोजी, प्रा. शुभा, प्रा. पूजा व अनुज देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.