विशेष पॅकेजची केली मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खु यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानाविषयी पंतप्रधान मोदींना माहिती दिली. हिमाचलकरता लवकर अंतरिम दिलासा निधी जारी करण्याची विनंती सुक्खू यांनी केली आहे. तसेच पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठविल्याप्रकरणी त्यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री सुक्खू यांनी पंतप्रधान मोदींकडे हिमाचलसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
सुक्खू यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेत नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती दिली. तसेच राज्य सरकार आणि पक्ष संघटनेविषयी राहुल गांधी यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. सुक्खू यांनी याचबरोबर भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतली आहे. हिमाचल प्रदेशला अधिकाधिक आर्थिक मदत मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी नड्डा यांना केले आहे.