Tarun Bharat

हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०२२

‘राज’ बदलले, रिवाज कायम

हिमाचल प्रदेशमध्ये पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा सुरूच : आता काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या, भाजप सत्तेतून बाहेर

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 5 वर्षांनंतर सरकार बदलण्याची प्रक्रिया यावेळीही दिसून आली. मतमोजणीअंती काँग्रेस सरकार स्थापनेकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी भाजप पिछाडीवर पडला असून मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. सायंकाळपर्यंत काँग्रेस पक्षाने 35 जागा जिंकल्या होत्या. तसेच अन्य चार-पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याने अखेरीस त्यांचा आकडा 40 इतका झाला. काँग्रेसला पूर्ण बहुमत प्राप्त झाल्याचे स्पष्ट होताच आता सरकारस्थापनेची तयारी सुरू झाली आहे. राज्यात भाजपने 25 जागा जिंकल्या असून इतर उमेदवारांनी 3 जागांवर विजय संपादन केला. तथापि, दिल्ली एमसीडीमध्ये विजयाची नोंद करणाऱया ‘आप’ला येथे खातेही उघडता आलेले नाही.

हिमाचल प्रदेशमधील पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. जनतेचा निकाल आम्हाला मान्य आहे. पाच वर्षांच्या सहकार्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो. राज्याच्या विकासासाठी सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. जनतेच्या विकासाचे काम कधीच थांबवणार नाही. आपल्याला पराभवामागील कारणांचे विश्लेषण करावे लागेल. निकालाची दिशा बदलणारे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला दिल्लीत बोलावले तर मी निश्चितपणे जाईन, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

जयराम ठाकूर यांची विजयी घोडदौड कायम

सेराज मतदारसंघातून मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांचा 20,000 हून अधिक मतांनी पराभव केला. त्यांनी विक्रमी सातव्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी स्वतः विजय मिळवला असला तरी राज्यात ते पक्षाला वाचवू शकले नाहीत.

काँग्रेसचे राजेंद्र राणा हे 399 मतांनी विजयी

सुजानपूर मतदारसंघातून काँग्रेसचे राजेंद्र राणा 399 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार कॅप्टन रणजितसिंग राणा यांचा पराभव केला. 2017 मध्ये राजेंद्र राणा यांनी माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा 1919 मतांनी पराभव केला होता.

दरांगमधून भाजपचे पूर्णचंद ठाकूर 618 मतांनी विजयी

दरांग विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पूर्णचंद ठाकूर 618 मतांनी विजयी झाले. मतमोजणीदरम्यान काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ दिसून आली. मात्र, अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

हमीरपूरमध्ये अपक्ष उमेदवाराची ‘चांदी’

हमीरपूर मतदारसंघात अपक्ष आशिष शर्मा 12,899 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. शर्मा यांना 25,916, काँग्रेसचे डॉ. पुष्पेंद्र यांना 13,017, तर भाजपचे नरेंद्र ठाकूर यांना 12,794 मते मिळाली आहेत.

‘कारण’मीमांसा

हिमाचलमध्ये गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेला सत्ता परिवर्तनाचा टेंड पुन्हा एकदा दिसून आला आहे. या निवडणुकीतील विजयाने काँग्रेसने पुन्हा एकदा ‘वापसी’ केली आहे. त्याचबरोबर भाजपचा पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण हिमाचलमधील सत्ता परिवर्तनाचा टेंड संपवण्यासाठी भाजपने खूप मेहनत घेतली होती. संपूर्ण शीर्ष नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हिमाचलमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाची ही पाच प्रमुख कारणे असू शकतात.

सत्ताविरोधी लाट आणि बंडखोरी

सत्ताविरोधी लाटेमुळे काँग्रेस या निवडणुकीत उत्साही होती. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगली. त्याचवेळी तिकीट वाटपामुळे भारतीय जनता पक्षातील अनेकांनी बंडखोरी वृत्ती स्वीकारल्याने एकूण 21 बंडखोरांनी भाजप उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपने बंडखोरांना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी त्याचा काही परिणाम झाला नाही.

बेरोजगारी, ‘अग्निवीर’विरोधी संताप

संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेसने राष्ट्रीय मुद्यांपेक्षा स्थानिक मुद्यांवर लोकांशी संपर्क साधण्यासाठी मुद्दे काळजीपूर्वक निवडले. काँग्रेस पक्षाच्या जाहीर प्रचारावेळी वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या दराबाबत सरकारला वेळोवेळी धारेवर धरण्यात आले. कोरोनाकाळानंतर हिमाचलमधील निवडणुकांमध्ये सरकारी नोकऱया हा मोठा मुद्दा बनला होता. दुसरीकडे, सरकारच्या नव्या अग्निवीर योजनेबद्दल राज्यातील जनता थोडी नाराज होती.

सफरचंद उत्पादक संतप्त

राज्यातील एकूण 68 मतदारसंघांपैकी सुमारे 34 विधानसभा मतदारसंघांमध्ये सफरचंद उत्पादकांचा निवडणूक निकालांवर प्रभाव पडतो. मात्र, यावेळी व्यवसायात होणारा नफा, खर्चाची उलाढाल आणि स्थानिक व्यापारी-कंपन्यांमुळे ते संतप्त झाले. यासोबतच पॅकेजिंगमध्ये जीएसटी वाढल्याने त्यांचा संताप आणखी वाढला. त्याचा परिणाम आता निवडणूक निकालात दिसून येत आहे.

जुनी पेन्शन योजना समस्या

संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने अडीच लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱयांना वेठीस धरण्यासाठी जुनी पेन्शन योजना सरकार स्थापन होताच लागू केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला.

नेत्यांचे बोल…

निवडणुकीतील जनादेशाचा आदर केला जाईल. आता मी राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. नवीन सरकारचे खूप खूप अभिनंदन. पंतप्रधानांच्या सहकार्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर (भाजप)

मोदीजींनी हिमाचल प्रदेशला अनेकवेळा भेट दिली, पण ते इथे आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत. राज्यात पराभव होणार हे भाजपला माहीत असल्याने पंतप्रधान मोदींनी वारंवार राज्याचा दौरा केला.

प्रतिभा सिंह (काँग्रेस)

हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पक्षनेते स्वतःला मजबूत समजत होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला येथे पूर्ण बहुमत मिळाल्याने आम्ही सरकार स्थापन करणार आहोत.

सुखविंदर सिंग सुक्खू (काँग्रेस)

11 पैकी 8 मंत्री निवडणुकीत पराभूत

हिमाचलमध्ये प्रत्येक निवडणुकीत 45 ते 75 टक्के मंत्री पराभूत होण्याची नोंद यापूर्वी झालेली आहे. यावेळीही जयराम ठाकूर मंत्रिमंडळातील 10 पैकी 8 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. निवडणुकीत पराभूत झालेल्या मंत्र्यांमध्ये सुरेश भारद्वाज, रामलाल मार्कंडा, वीरेंद्र कंवर, गोविंद सिंह ठाकूर, राकेश पठानिया, डॉ. राजीव सैजल, सरवीन चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा समावेश आहे. जयराम ठाकूर यांच्याव्यतिरिक्त केवळ विक्रम ठाकूर आणि सुखराम चौधरी यांनाच निवडणूक जिंकता आली.

  • नगरविकास मंत्री असलेले सुरेश भारद्वाज हे शिमला जिह्यातील कसुम्पती मतदारसंघातून काँग्रेसच्या अनिरुद्ध सिंग यांच्याकडून पराभूत झाले. भारद्वाज यांचा शिमला अर्बन मतदारसंघ बदलून हायकमांडने त्यांना कसुम्पती मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
  • सोलन जिल्हय़ातील कसौली मतदारसंघातून निवडणूक लढलेले आरोग्यमंत्री डॉ. राजीव सैजल यांचा काँग्रेसच्या विनोद सुलतानपुरी यांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे उमेदवार विनोद सुलतानपुरी यांनी त्यांचा 6,768 मतांनी पराभव केला.
  • शिक्षणमंत्री गोविंदसिंह ठाकूर यांचाही निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसच्या भुवनेश्वर गौर यांनी गोविंद सिंह ठाकूर यांचा मनाली मतदारसंघातून पराभव केला.
  • जयराम ठाकूर सरकारमध्ये मंत्री असलेले डॉ. रामलाल मार्कंडा लाहौल-स्पिती मतदारसंघातून काँग्रेसच्या रवी ठाकूर यांच्याकडून पराभूत झाल्याने तो मोठा धक्का मानला जातो.
  • मंत्री सरवीन चौधरी कांगडा जिह्यातील शाहपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या केवलसिंग पठानिया यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले.

प्रियांका गांधींची जादू

हिमाचल प्रदेशमधील दणदणीत विजयाने राज्यात पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणाऱया काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी हे पहिले निवडणूक यश मानले जात आहे. पक्षाला मजबूत करण्याचे आव्हान स्विकारत त्यांनी ऑक्टोबरमध्ये प्रचाराची सुरुवात केल्यानंतर, त्यांनी राज्यभरात सुमारे 10 रॅलींना संबोधित केले.

Related Stories

400 कोटींचे हेरॉईन गुजरातमध्ये जप्त

Patil_p

तुर्कस्तानने परत पाठविला भारतीय गहू

Patil_p

दिल्लीत 3,324 नवे कोरोना रुग्ण; 44 मृत्यू

Tousif Mujawar

गायीला साक्ष मानून विवाह

Patil_p

दिल्लीत कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा

Patil_p

गुजरातमध्ये अत्याधुनिक सेमीकंडक्टर कारखाना होणार

Patil_p