गीताही वाचतात विद्यार्थी ः भारतीय संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर
ऑकलंड ः
न्यूझीलंड या देशातील ऑकलंड आणि हॅमिल्टन या ठिकाणी तीन हिंदी शाळा उघडल्या आहेत. त्यामध्ये लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वजण हिंदी भाषेसह रामायण, गीता, भागवत आदीचे वाचन करत आहेत.
भारतीय वंशाच्या लोकांनी 2001 मध्ये ऑकलंडमधील हेंडरसन येथील वेटकेरेच्या वेस्ट विंगमध्ये हिंदी शाळेची स्थापना केली आहे. खरं पाहिलं तर त्यावेळी भारतीय प्रौढ रामायण वाचत होते तर मुलं खेळत होती. तेव्हा शाळेचे अध्यक्ष सतेन शर्मा यांनी मुलांना तुम्ही रामायण का वाचत नाही, असा सवाल केला. त्यावर मुलांनी हिंदी वाचता येत नसल्याचे सांगितले. यासाठीच हिंदी शाळा सुरू करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
2022 पर्यंत शाळेत 260 विद्यार्थी
फिजीहून आलेल्या काही भारतीयांनी हिंदीत लिहिलेले रामायण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. शाळा 2001 मध्ये उघडली, त्यात 40 विद्यार्थी होते. 2022 पर्यंत 260 विद्यार्थी. नवीन पिढी रामायण वाचते आणि संगीतही गाते, अशा प्रकारे 2003 पासून भारतीय संगीत अभ्यासक्रमाचा भाग बनवलेला आहे.
भारतातून आलेल्या बसंत मधुर यांनी तबला, हार्मोनियम शिकवण्यास सुरुवात केली आणि त्यांना फिजी येथील मास्टर अशोक यांनी साथ दिली.