भारतविरोधी चित्र रेखाटण्याचा प्रकार ः खलिस्तानवाद्यांची पुन्हा आगळीक
वृत्तसंस्था/ टोरंटो
ऑस्ट्रेलियानंतर आता कॅनडामध्ये हिंदू धर्मीयांच्या गौरीशंकर मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. कॅनडाच्या ब्राम्पटन प्रांतात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे भारतीय समुदाय दुखावला गेला आहे. ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यांमागे खलिस्तान समर्थकांचा हात होता. या खलिस्तानवाद्यांनी मेलबर्नमध्ये कथित जनमत चाचणी करविली होती आणि यादरम्यान भारतीयांना मारहाण केली होती. तसेच खलिस्तान समर्थकांनी भारतीय ध्वजाचा अपमान केला होता.
टोरंटोमधील भारतीय महावाणिज्य दूतावासाने मंगळवारी एक वक्तव्य जारी करत ब्राम्पटन येथील गौरीशंकर मंदिरावर झालेल्या हल्ल्याची निंदा केली आहे. या घृणास्पद कृत्याने कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कॅनडाच्या अधिकाऱयांसमोर आम्ही याप्रकरणी स्वतःच्या चिंता व्यक्त केल्या आहेत असे दूतावासाने म्हटले आहे. मंदिरावरील हल्ल्याची चौकशी स्थानिक अधिकाऱयांकडून केली जात आहे. ब्राम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी हल्ल्याच्या घटनेची निंदा केली आहे.
क्रूरतापूर्ण या घृणास्पद कृत्याला आमच्या शहरात किंवा देशात कुठलेच स्थान नाही. क्षेत्रीय पोलीस प्रमुख निशान दुरैयप्पा यांच्यासोबत अशाप्रकारचे हल्ले रोखण्यासंबंधी चर्चा केली असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. कॅनडातील ही घटना ऑस्ट्रेलियात तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्यावर घडली आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात कॅनडाच्या रिचमंड हिल भागात एका विष्णू मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला होता.