गडहिंग्लज तालुक्यात धुवाधार पाऊस
प्रतिनिधी/गडहिंग्लज
गडहिंग्लजसह परिसरात गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून सततच्या होणा-या पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी बंधारे पाण्याखाली गेले आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात गडहिंग्लज तालुक्यात 33 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आजअखेर तालुक्यात सरासरी 352 मि.मी. पावसाची नेंद झाली आहे.
गडहिंग्लजसह वडरगे, कडगाव, भडगाव, जरळी, दुंडगे, करंबळी, शेंद्री, औरनाळ, हनिमनाळ, गिवजणे, अत्याळ आदी भागात दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे ऐनापूर, निलजी बंधारे पाण्याखाली गेले असून खबरदारीसाठी यामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर जरळी, इंचनाळ, गिवजणे, नांगनूर बंधा-या लगत पाणी आले आहे. सततच्या पावसामुळे ओढे-नाले तुडूंब वाहत असून शेतवडीतील पाणी बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे हिरण्यकेशी, घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून असाच पाउस सुरू राहिल्यास लवकरच हिरण्यकेशी नदीला पूर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यातील 352. 57 मि. मी पावसाची नोंद झाली आहेत. यामध्ये गडहिंग्लज 21 मि. मी, कडगाव 27 मि. मी, दुंडगे 22 मि. मी, हलकर्णी 17 मि. मी, नूल 30 मि. मी, महागाव 54 मि. मी तर नेसरी मंडलात 60 मि. मी पावसाची नोंद झाली आहे.