Tarun Bharat

लॉन बॉल्स, टेटेमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्ण

लॉन बॉल्स गटात महिला तर टेटेमध्ये पुरुष गटाला अव्वल यश, हेविवेट लिफ्टर विकास ठाकुर रौप्यपदकाचा मानकरी

बर्मिंगहम / वृत्तसंस्था

भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत अगदी ऐतिहासिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम गाजवला. लवली चौबे (लीड), पिंकी (सेकंड), नयनमोनी साईकिया (थर्ड) व रुपा राणी तिर्की (स्कीप) यांनी महिलांच्या फोर्स फायनलमध्ये मधल्या टप्पात पिछाडीवर फेकले गेले असतानाही जेतेपद खेचून आणत एकच खळबळ उडवून दिली.

महिला लॉन बॉल्स संघाचा न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला विजय नाटय़मय मानला गेला होता. तोच धडाका त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनलमध्येही कायम राखला. येथे त्यांनी 17-10 अशा फरकाने विजय मिळवत आफ्रिकेला चारीमुंडय़ा चीत केले. भारतासाठी हे एकूण चौथे व या हंगामात वेटलिफ्ंिटग वगळता अन्य स्पर्धेतील पहिलेच सुवर्ण ठरले.

भारतीय संघ अंतिम लढतीत एकवेळ 8-2 अशा एकतर्फी आघाडीवर होता. मात्र, थबेलो (लीड), ब्रिजेट कॅलित्झ (सेकंड), इस्मे क्रगर (थर्ड) व जोहाना स्निमॅन (स्कीप) यांनी दक्षिण आफ्रिकेला 8-8 अशी बरोबरी मिळवून देत लढतीत काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले. पुढे निर्णायक टप्प्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आणि अंतिमतः दमदार विजय संपादन केला.

टेटे पुरुष गटाचे सुवर्ण कायम

हरमीत देसाईने निर्णायक एकेरीत रोमांचक विजय संपादन केल्यानंतर भारतीय पुरुष संघाने टेटेमधील राष्ट्रकुल जेतेपद कायम राखण्याचा पराक्रम गाजवला. त्यांनी सिंगापूरविरुद्ध रोमांचक लढतीत विजय अक्षरशः खेचून आणला.

जागतिक क्रमवारीतील 121 व्या मानांकित हरमीतने 133 व्या मानांकित झे यू क्लॅरेन्स याचा 11-8, 11-5, 11-6 असा पराभव केला आणि येथेच भारताचे सुवर्ण निश्चित झाले. मँचेस्टर 2002 मध्ये या खेळाचा राष्ट्रकुलमध्ये समावेश झाल्यानंतर भारताने यात पदक जिंकण्याची ही सातवी वेळ होती.

वास्तविक, सिंगापूरविरुद्ध भारत पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार होता. पण, शरथला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने काही काळ सामन्यात रंगत निर्माण झाली होती. हरमीत व साथियन यांनी दुहेरीच्या सलामी लढतीत सहज विजय मिळवला. मात्र, पहिल्या एकेरीत शरथने क्लॅरेन्सविरुद्ध पराभूत होणे धक्कादायक ठरले होते.

हेविवेट लिफ्टर विकास ठाकुरला रौप्य

भारतीय हेविवेट लिफ्टर विकास ठाकुरने पुरुषांच्या 96 किलोग्रॅम वजनगटात रौप्य जिंकून दिले. त्याने 346 किलोग्रॅम (155 व 191 किलो) वजन उचलत या इव्हेंटमध्ये दुसरे स्थान संपादन केले. विकास ठाकुरने यापूर्वी 2014 ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्य जिंकले होते.

यंदा सामोआच्या डॉन ओपेलोगेने 381 किलोग्रॅम (171 व 210 किलो) लिफ्टसह सुवर्ण तर फिजीच्या रैनिबोगीने 343 किलोग्रॅम (155 व 188 किलो) लिफ्टसह कांस्यपदकाची कमाई केली. आजवर राष्ट्रकुल इतिहासात एकूण पाच पदके जिंकलेल्या विकास ठाकुरने 149 किलो, 153 किलो व 155 किलो असे 3 क्लीन लिफ्ट नोंदवत स्नॅचमध्ये सहज आगेकूच केली. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने 187 किलोग्रॅम लिफ्टसह जोरदार सुरुवात केली व दुसऱया फेरीत 191 किलोग्रॅम वजनही उचलले. यानंतर भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनच्या थाटात त्याने ‘थाय-फाईव्ह’सह आनंद साजरा करणे लक्षवेधी ठरले.

भारतीय महिला हॉकी संघ इंग्लंडविरुद्ध पराभूत

येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला अ गटातील साखळी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने गिसेले ऍन्स्लेच्या तिसऱया मिनिटाला नोंदवलेल्या गोलमुळे प्रारंभीच महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. त्यानंतर टेस हॉवर्डने 40 व्या मिनिटाला इंग्लंडची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. हन्नाह मार्टिनने चौथ्या व शेवटच्या क्वॉर्टरमध्ये संघाचा तिसरा गोल केला तर भारताने 60 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. यावेळी वंदना कटारियाने पेनल्टी कॉर्नरवर गोलजाळय़ाचा वेध घेतला.

Related Stories

पावल्युचेन्कोव्हा कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

भीती असूनही बेलारुसमध्ये फुटबॉल सामने सुरूच

Patil_p

दुबई पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, प्रमोद, मानसीची निवड

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रांचीत दाखल

Amit Kulkarni

दुसऱया डब्ल्यूटीसीसाठी गुण पद्धतीत बदल

Patil_p

इंग्लंड कसोटी संघात नवोदित बेसला संधी

Patil_p