पेरूमधील धक्कादायक घटना ः केवळ अवशेष शिल्लक
वृत्तसंस्था/ लीमा
दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये अध्यक्ष डीना बुलेर्तो यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान तेथील एका ऐतिहासिक वास्तूचा मोठा हिस्सा जळून खाक झाला आहे. ही इमारत 500 चौरस मीटरमध्ये फैलावलेली होती. नॅशनल स्ट्राइकदरम्यान राजधानी लीमामध्ये हजारो लोक जागतिक वारसास्थळ प्लाझा सॅन मार्टिननजीक एकत्र झाले होते. हे निदर्शक पोलिसांसोबत झटापट करत होते. या निदर्शकांना रोखण्याच्या नादात पोलिसांकडून झालेल्या चुकीमुळे या इमारतीने पेट घेतला आहे.
पोलिसांकडून डागण्यात आलेल्या अश्रूधूराच्या कांडय़ांमुळे इमारतीला ही आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी निदर्शकांवर सोडलेल्या अश्रूधूराच्या कांडय़ांपैकी एक इमारतीत कोसळली, ज्यानंतर तेथे आग लागण्यास सुरुवात झाल्याचे एका महिलेने म्हटले आहे.
पेरूमध्ये माजी अध्यक्ष पेड्रो कास्तिला यांचे समर्थक आणि सुरक्षा दलांदरम्यान अनेक महिन्यांपासून हिंसक झटापट सुरू आहे. यात आतापर्यंत 50 जण मारले गेले आहेत. तर शेकडो जखमी झाले असून यात अनेक महिलांचा समावेश आहे. पेरूमध्ये सुमारे 3 वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे.
डिसेंबर महिन्यात माजी अध्यक्ष पेड्रो कास्तिला यांच्यावर भ्रष्टाचार अन् बळजबरीने निर्णय लादण्याचे आरोप झाले होते. यावरून संसदेत त्यांना विरोध सुरू झाला आणि राजीनाम्याची मागणी होऊ लागली. पेड्रो यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केला होता. संसदेत 130 पैकी 101 मते त्यांच्या विरोधात पडल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. तेव्हापासून त्यांचे समर्थक नाराज आहेत.
पेड्रो यांना पद सोडावे लागल्यावर डीना बुलेर्तो हे नवे अध्यक्ष झाले आहेत. हिंसेची धमकी देणाऱया पेड्रो यांना अटक करण्यात आल्यापासून देशात हिंसा सुरू झाली आहे.