सेंट्रल व्हिस्टा उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींचे उद्गार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमानंतर वर्षानुवर्षे जुना ‘राजपथ’ आता ‘कर्तव्यपथ’ बनला आहे. यासोबतच पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळय़ाचेही अनावरण केले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी पुनर्विकास प्रकल्पावर काम करणाऱया सर्व कामगारांना आमंत्रित करून गौरव करण्यात येणार असल्याचेही पंतप्रधानांनी जाहीर केले.
आज सर्व देशवासीय एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहेत. गुलामगिरीचे प्रतीक असणारे ‘राजपथ’ हे नाव आजपासून इतिहासजमा झाले आहे. आता ही ओळख पुसली गेली असून ‘कर्त्यव्यपथ’च्या रूपाने नवा इतिहास रचला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आज देशाला नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी उद्घाटन सोहळय़ानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मोठा पुतळा इंडिया गेटजवळ बसवण्यात आला आहे. त्याविषयी बोलताना सुभाषचंद्र बोस हे एक महान व्यक्ती होते. पद आणि संसाधनांच्या आव्हानापलीकडे त्यांचे महत्त्व असून त्यांना संपूर्ण जगाने ‘नेता’ मानले आहे. त्यांच्याकडे धैर्य, स्वाभिमान याबरोबरच नवकल्पना, दूरदृष्टीही होती. नेतृत्व क्षमता आणि धोरणे आखण्यातही ते सदैव सरस राहिले. जर आपल्या भारताने स्वातंत्र्यानंतर सुभाषबाबूंचा मार्ग अवलंबला असता तर आज देशाची उंची आणखी वाढली असती, असे पंतप्रधान म्हणाले.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पस्थळ सर्वसामान्यांसाठी खुले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. नवनिर्मित करण्यात आलेला हा भाग 20 महिन्यांनंतर सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. शुक्रवारपासून इंडिया गेट ते मानसिंग रोडपर्यंतच्या संपूर्ण परिसरात पर्यटक फिरू शकतील. येथे 16 पूल (ब्रीज) बांधण्यात आले असून संपूर्ण भागात 1 हजार 125 वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय इंडिया गेटजवळ 35 बसेससाठी पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे.
दिल्लीत येणाऱया लोकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र असणारा ‘सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू’ पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये संसदेची नवीन त्रिकोणी इमारत, एक सामान्य केंद्रीय सचिवालय, तीन किलोमीटरच्या राजपथाचे पुनरुज्जीवन, नवीन पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालये आणि उपराष्ट्रपती भवन यांचा समावेश आहे.
खाद्यपदार्थ स्टॉल्सचे आकर्षण
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या बाजूने प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असून चहूबाजूंनी हिरवेगार असलेले लाल ग्रॅनाईट वॉकवे साकारण्यात आले आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पस्थळी पाच वेंडिंग झोन तयार करण्यात आले असून तेथे 40 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. इंडिया गेटजवळ दोन ब्लॉक असून प्रत्येक ब्लॉकमध्ये आठ स्टॉल्स आहेत. मात्र, सुरक्षितता आणि स्वच्छतेला अनुसरून उद्यान परिसरात कोणतेही खाद्यपदार्थ विक्रीस आणि खाण्यास मनाई करण्यात येत आहे.
कडक बंदोबस्त तैनात
उद्घाटनानंतर प्रकल्प सर्वसामान्य लोकांसाठी खुला होताच येथे चोवीस तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नव्याने स्थापन झालेल्या सुविधांमध्ये चोरी आणि नुकसान होऊ नये यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे 80 सुरक्षारक्षक या मार्गावर लक्ष ठेवणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. तसेच दहशतवादी हल्ल्यापासून सावधानता बाळगण्यासाठी अन्य यंत्रणांची मदतही घेतली जाणार आहे. सर्व परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारेही नजर ठेवली जाणार आहे.