Tarun Bharat

गुजरात बालेकिल्लयात रचला इतिहास

‘पटेल-पाटील’ जोडी ठरली सुपरहिट

गुजरातच्या निवडणुकीत भाजपने स्वतःचा 20 वर्षे जुना तर काँग्रेसचा 37 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. भाजपने 2002 च्या निवडणुकीत 127 जागा जिंकल्या होत्या. भाजपने हा आकडा ओलांडण्यासह काँगेसचे दिग्गज नेते माधवसिंह सोलंकी यांच्या 1985 च्या 149 जागांचा विक्रमही मोडला आहे. भाजपने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करत पटेल समुदायाची नाराजी दूर करण्यास यश मिळविले. तर दुसरीकडे सी. आर. पाटील या मराठमोळय़ा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले. पटेल आणि पाटील यांच्या जोडीचा भाजपने हा राबविलेला हा प्रयोग सुपरहिट ठरला आहे.

सलग सातव्यांदा सरकार

निवडणूक वर्षमतांची टक्केवारी
202252.50
201749.05
201247.85
200749.12
200249.85
199844.81
199542.51
198526.69

गुजरातमध्ये भाजप सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. या निकालाने अँटी इन्कम्बन्सीऐवजी प्रो-इन्कम्बन्सीवर चर्चा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आम आदमी पक्षाच्या एंट्रीमुळे ही निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक मानली जात होती, परंतु भाजपने सर्व अनुमान खोटे ठरवत विक्रमी आकडा गाठला आहे. भाजपला 2002 च्या निवडणुकीत 49.85 टक्के मते मिळाली होती, परंतु या निवडणुकीत भाजपने 52 टक्क्यांहून अधिक मते मिळविली आहेत.काँगेसचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱया अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने विजय मिळविला आहे.भाजप आता पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांच्या एकूण सत्ताकालावधीनजीक पोहोचला आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांनी सलग 34 वर्षांपर्यंत सरकार चालविले होते. 2022 च्या निवडणुकीत भाजपच्या विजयासोबत गुजरातमध्ये भाजपचा शासन कालावधी कमीत कमी 32 वर्षांचा होणार आहे.

गुजरातमध्ये भाजपचा विक्रमी विजय

1985 मधील काँग्रेसचा विक्रम मोडीत : 156 जागा जिंकून भाजपने स्वतःचा बालेकिल्ला राखला; विरोधी पक्षांची दाणादाण

गुजरातमध्ये 156 जागा जिंकून भाजपने विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. काँगेसने 1985 मध्ये माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली 149 जागा राज्यात जिंकल्या होत्या. तर नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना भाजपने 2002 च्या निवडणुकीत 127 जागा मिळविल्या होत्या. परंतु यावेळी भाजपने दिमाखदार विजय मिळवत 1985 चा विक्रम मोडीत काढला आहे. निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र मोडणार’ असे उद्गार काढले होते. मोदींचे हे उद्गार खरे ठरले आहेत. गुजरातच्या 182 सदस्यीय विधानसभेत भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागांवर 57 ची भर पडली आहे. तर काँग्रेसला 60 जागांचे नुकसान झाले आहे. पक्षाने मागील वेळी 77 जागा जिंकल्या होत्या. परंतु यावेळी काँगेसला केवळ 17 जागाच प्राप्त करता आल्या आहेत.

जनतेचा विश्वास दर्शविणारा विजय

गुजरात विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल आता स्पष्ट झाला आहे. दोन दशकांपासून सुरू असलेली गुजरातची ही विकासयात्रा अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार येथील जनतेने केला आहे. येथील लोकांना पुन्हा एकदा भाजपवर अतूट विश्वास दाखविला असल्याचे उद्गार मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काढले आहेत.

‘आप’ला केवळ 5 जागा

 आम आदमी पक्ष गुजरातमध्ये केवळ 5 जागा जिंकू शकला आहे. या पक्षाचे तीन मोठे नेते पराभूत झाले आहेत. यात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि पाटीदार नेते अल्पेश कथीरिया सामील आहेत. परंतु मतांच्या हिस्सेदारीच्या आधारावर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. यामुळे आपला पूर्ण देशात स्वतःचे नाव आणि निवडणूक चिन्हासह लढता येणार आहे.

ओवैसी यांचे सर्व उमेदवार पराभूत

असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएमने पहिल्यांदाच गुजरात विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. एआयएमआयएमने एकूण 13 उमेदवार उभे केले होते आणि यातील 2 उमेदवार हिंदूधर्मीय होते. पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. वडोदरा येथील वाघोडिया मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार मधू श्रीवास्तव यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. तर अपक्ष आणि इतर उमेदवारांनी 4 जागा जिंकल्या आहेत.

घाटलोडिया (अहमदाबाद) : गुजरातला दोन मुख्यमंत्री देणारा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. आनंदीबेन पटेल आणि भूपेंद्र पटेल यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पाटीदार मतदारांचे प्रमाण लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसने यावेळी राज्यसभा खासदार अमीबेन याग्निक यांना उमेदवारी दिली होती. तर आपच्या वतीने विजय पटेल यांनी निवडणूक लढविली होती. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मोठय़ा फरकाने पराभूत करत भूपेंद्र पटेल यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे.

राजकोट पश्चिम : राजकोट-पश्चिम या मतदारसंघातून नरेंद्र मोदींनी 2002 मध्ये स्वतःची पहिली निवडणूक लढविली होती. मागील निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले विजय रुपाणी यांनी येथून 53 हजार मतांनी विजय मिळविला होता. परंतु यावेळी भाजपने रुपाणी यांच्याऐवजी दर्शिता शाह यांना मैदानात उतरविले होते. काँग्रेसचे मनसखभाई आणि आपचे दिनेश जोशी यांना दर्शिता शाह यांनी पराभूत केले आहे.

जामनगर उत्तर : या मतदारसंघात क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा हिने भाजपच्या वतीने निवडणूक लढवत विजय मिळविला आहे. काँगेसचे दिग्गज नेते बिपेंद्र सिंह जडेजा आणि आपचे कर्सन करमोर यांना रिवाबाने पराभूत केले आहे. विशेष म्हणजे रिवाबाच्या विरोधात रविंद्र जडेजाच्या बहिणीनेच प्रचार केला होता. रिवाबाचे सासरे अनिरुद्ध जडेजाही सुनेच्या विरोधात जात काँग्रेस उमेदवाराला समर्थन देताना दिसून आले होते.

विरमगाम (अहमदाबाद) : काँगेस सोडून भाजपमध्ये सामील झालेले हार्दिक पटेल हे विरमगाम मतदारसंघात विजयी झाले आहेत. मागील दोन निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला होता. 2002 आणि 2007 मध्ये येथे विजय मिळविणाऱया काँगेसने दिग्गज नेते लाखाभाई भारवाड यांना मैदानात उतरविले होते. तर आपने अमर सिंह ठाकोर यांना उमेदवारी दिली होती.

मोरबी : कांतिलाल अमृतिया यांनी भाजपच्या उमेदवारीवर मोरबी मतदारसंघात पाचवेळी विजय मिळविला आहे, परंतु 2017 मध्ये अमृतिया यांना काँगेस नेते बृजेश मेरजा यांनी पराभूत केले होते. मेरजा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे 2018 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि यात मेरजा हेच विजयी झाले होते. परंतु भाजपने यावेळी त्यांना उमेदवारी नाकारून पुन्हा अमृतिया यांना संधी दिली होती. मोरबी पूल दुर्घटनेवेळी लोकांचा जीव वाचविण्यासाठी अमृतिया यांनी मच्छू नदीत उडी घेतली होती. अमृतिया यांच्या विरोधात काँग्रेसने जयंति पटेल तर ‘आप’ने पंकज रणसरिया यांना मैदानात उतरविले होते. अमृतिया यांनी 62,079 मतांनी विजय मिळविला आहे.

मणिनगर (अहमदाबाद) : गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी हे 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत अहमदाबादच्या मणिनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. या मतदारसंघावर मागील 8 निवडणुकांपासून भाजपचा कब्जा आहे. पक्षाने येथे अमूल भट्ट यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी ‘आप’चे विपुलभाई पटेल आणि काँगेसचे सी.एम. राजपूर यांना पराभूत पेले आहे.

नारणपुरा (अहमदाबाद) : अहमदाबादचा नारणपुरा विधानसभा मतदारसंघ परिसीमनानंतर 2012 मध्ये अस्तित्वात आला आहे. या मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत अमित शाह यांनी मोठा विजय मिळविला होता. त्यानंतर 2017मध्ये भाजपचे कौशिकभाई पटेल यांनी येथे विजयाचा झेंडा रोवला होता. यावेळी भाजपने जितेंद्रभाई पटेल यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे सोनल पटेल आणि आपचे पंकज पटेल यांना जितेंद्रभाई यांनी पराभूत केले आहे.

खंभालिया (द्वारका)  : खंभालिया मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी निवडणूक लढवत होते. भाजपने मुलुभाई हरदासभाई बेरा आणि काँगेसने विद्यमान आमदार विक्रम माडम यांना उमेदवारी दिली होती. ओवैसी यांच्या एआयएमआयएमने देखील येथे उमेदवार उभा केला होता. या मतदारसंघात मुस्लिमांची मते लक्षणीय प्रमाणात होती. तरीही इसुदान गढवी यांना पराभव पत्करावा लागला आहे.

बायड (अरावली) : माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंह यांनी येथून निवडणूक लढविली. महेंद्र सिंह यांनी 2012 ची निवडणूक काँग्रेसच्या वतीने लढवत जिंकली होती. त्यांनी 2017 ची निवडणूक लढविली नव्हती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु तीन महिन्यांनी ते काँग्रेसमध्ये परतले होते. येथे भाजपने भीखीबेन परमार आणि ‘आप’चे चुनीभाई पटेल यांना उमेदवारी दिली होती. महेंद्र सिंह यांना भीखीबेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

गुजरातमध्ये पुन्हा मोदींचा करिष्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदोचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळविला आहे. एकूण 182 जागांपैकी 156 जागांवर भाजपने विजय मिळविला. तर काँग्रेसला केवळ 17 जागा मिळविता आल्या आहेत. आम आदमी पक्षाला केवळ 5 जागा जिंकता आल्याने अरविंद केजरीवालांचे दावे फोल ठरले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत अत्यंत मेहनत करत स्वतःची सत्ता राखू शकलेला भाजप 5 वर्षांनी अभूतपूर्व यश कसा मिळवू शकला हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘यशाचा कानमंत्र’ आहे.

1985 मध्ये माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँगेसने 149 जागा जिंकल्या होत्या. राज्यातील कुठल्याही पक्षाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती, परंतु यावेळी भाजपच्या लाटेत सोलंकी यांचा विक्रम मोडीत निघाला आहे. राज्यात यावेळी भाजपला 52 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

पंतप्रधान मोदींकडे होती धुरा

गुजरातच्या मागील निवडणुकीत भाजपला 100 चा आकडाही गाठता आला नव्हता. भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. 1995 नंतर राज्यात भाजपची सर्वात खराब कामगिरी ठरली होती. भाजपच्या खराब कामगिरीसाठी अनेक घटक कारणीभूत ठरले होते. राजकीयदृष्टय़ा प्रभावशाली पाटीदार समुदायांमध्ये आरक्षणावरून नाराजी होती. तेव्हा पाटीदार आरक्षण आंदोलन तीव्र होते. ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली होती. तसेच काही काळापूर्वीच लागू झालेल्या जीएसटीमुळे व्यावसायिकांमध्ये रोष होता. ऊना समवेत काही ठिकाणी दलितांवर झालेल्या हल्ल्यावरुन नाराजी होती. 2017 मधील झटक्यानंतर पंतप्रधान मोदी हे सतर्क झाले होते. त्यांनी भाजपचा सर्वात मजबूत गड असलेल्या गुजरातची सत्ता वाचविण्यासाठी प्रचाराची धुरा स्वतःकडे घेतली होती.

प्रतिस्पर्ध्याला कमकुवत करणारा मंत्र

2017 नंतर भाजपने विरोधी गटातील परंतु प्रभावशाली नेत्यांना स्वतःच्या बाजूने वळविण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले होते. पाटीदार आंदोलनाच्या नेत्यांमध्ये पुढील काळात फूट पडली, आंदोलनाचे प्रमुख चेहरे हार्दिक पटेल एकाकी पडले. काही काळानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. प्रभावशाली युवा नेते आणि ओबीसी चेहरे अल्पेश ठाकोर यांना भाजपने सदस्यत्व प्रदान केले. 2022 ची निवडणूक नजीक येताच भाजपने हार्दिक पटेल यांनाही स्वतःच्या गोटात सामील केले. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेच्या पुंवरजी बवलिया, जवाहर चावडा, जीतू चौधरी, अक्षय पटेल, जे.व्ही. काकडिया, प्रद्युम्न सिंह जडेजा, पुरुषोत्तम बाबरिया यांच्यासह अनेक आमदारांनी काँगेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांच्या माध्यमातून भाजपला क्षेत्रीय तसेच जातीय समीकरणे जुळविता आली. कंवरजी बावलिया हे कोळी समुदायाचे प्रभावशाली नेते आहेत. 

जातीय अन् विकासाची समीकरणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करत गुजरातची समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला होता. सौराष्ट्रातील तीन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळाले होते. यातील मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांना कॅबिनेट मंत्री तर डॉक्टर महेंद्र भाई मुंजापारा यांना राज्यमंत्री करण्यात आले. मांडविया आणि रुपाला हे दोघेही पाटीदार आहेत. एक लेउवा तर दुसरा कडवा पाटीदार समुदायाशी संबंधित आहेत.

सत्ताविरोधी भावनाच निकालात काढली

गुजरात नेहमीच भाजपची राजकीय प्रयोगशाळा राहिली आहे. मागील वर्षी भाजपने मास्टरस्ट्रोक करत सत्ताविरोधी भावनाच निकालात काढली होती. एका दिवसात गुजरातचे पूर्ण सरकारचे बदलले. तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला. पाटीदार नेते भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात नव्या नेत्यांना संधी देण्यात आली. तसेच क्षेत्रीय आणि जातीय संतुलन साधण्यात आले. यामुळे अनेक वर्षे सत्तेवर राहिल्याने निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सीच दूर झाली. तर तिकिटवाटपात विजय रुपाणी, नितिन पटेल, भूपेंद्र सिंह चूडास्मा यासारख्या दिग्गजांऐवजी नव्या चेहऱयांना तिकीट देण्यात आले. अनेक आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. अँटी इन्कम्बन्सी दूर करण्यास भाजप यशस्वी ठरल्याचे या निकालातून स्पष्ट होते.

गुजरात मॉडेल, गुजराती अस्मिता

आम आदमी पक्षाच्या गुजरातमधील एंट्रीसह भाजप सतर्क झाला होता. पंतप्रधान मोदींनी ‘मोफतची रेवडी’ संस्कृतीवर शरसंधान करत आम आदमी पक्षाला आरोपीच्या पिंजऱयात उभे पेले. भाजप नेतृत्व आम आदमी पक्षावर तुटून पडले होते. नेहमीप्रमाणे यावेळीही गुजराती अस्मितेचे कार्ड पुढे करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीपूर्वी मोदींनी गुजरातमध्ये हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. भाजपने गुजरातच्या विकास मॉडेलला जनतेसमोर ठेवले. फॉक्सकॉन-वेदांताने सेमीकंडक्टर चिप निर्मितीच्या 20 अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पासाठी गुजरातची निवड केली. भारतीय वायुदलासाठी परिवहन विमान सी-295 निर्मितीकरता टाटा-एअरबसने गुजरातची निवड गेली. या सर्व गोष्टींमुळे गुजरातच्या ‘विकास मॉडेल’ला आणखी मजबुती मिळाली. गुंतवणुकीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुजरात पहिली पसंत असल्याचा संदेश गेला.

भाजपचा मजबूत बालेकिल्ला

गुजरातमध्ये 17 महिन्यांचा अपवाद सोडल्यास मागील 27 वर्षांपासून सातत्याने भाजपचे सरकार आहे. तसेच पुढील 5 वर्षांपर्यंत भाजप सत्तेवर राहणार आहे. 1995 मध्ये पहिल्यांदा केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजपचे सरकार आले होते. त्यानंतर 17 महिन्यांचा कालावधी सोडल्यास सातत्याने राज्यात भाजपचा झेंडा फडकत आहे. ऑक्टोबर 1996 मध्ये भाजप नेते शंकरसिंह वाघेला यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या समर्थनाने सरकार स्थापन केले होते. वाघेला यांनी बंडखोरीनंतर राष्ट्रीय जनता पक्ष नावाने नवा पक्ष स्थापन केला होता. ऑक्टोबर 1997 मध्ये राष्ट्रीय जनता पक्षाचे दिलीप पारिख मुख्यमंत्री झाले होते जे मार्च 1998 पर्यंत पदावर होते. 1995 नंतर हा 17 महिन्यांचा अपवाद वगळल्यास गुजरातमध्ये भाजपच सत्तेवर आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसची नामुस्की

राहुल गांधी यांच्यासाठी राजकीय संदेश

जरातच्या जनतेने यावेळीही स्पष्ट जनादेश दिला असून भाजपला विक्रमी जागा जिंकता आल्या आहेत. भाजपच्या या अत्यंत दिमाखदार विजयामागे अनेक कारणे आहेत, परंतु काँग्रेसच्या या नामुष्कीचीही समीक्षा करणे त्याच्या नेतृत्वाला आवश्यक ठरणार आहे. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसने एका निश्चित रणनीतिच्या अंतर्गत प्रचार केला होता. दिग्गज राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांऐवजी स्थानिक नेतृत्वाला प्रचाराकरता समोर करण्यात आले होते. काँग्रेसने ज्या नेत्यांना प्रचाराची धुरा सोपविली होती, त्यांच्यात अनुभवाची कमतरता होत. तसेच या नेत्यांना गुजरातमध्ये जनतेचा मोठा पाठिंबाही नव्हता. काँग्रेसने गुजरातमध्ये 7 कार्यकारी अध्यक्ष नेमले होते, त्यांनाही जुलै महिन्यात नियुक्त करण्यात आले होते. यातील ललित कगाथारा हे एकवेळचे आमदार होते, अशाच प्रकारे राजुलाचे माजी आमदार अंब्रीश दर, चोटिलाचे माजी आमदार रुतविक मकवाना यांनाही जबाबदारी देण्यात आली होती. गुजरातमध्ये भरत सोलंकी, सिद्धार्थ पटेल, अर्जुन मोधवाडिया असे नेते असले तरीही एक टीमप्रमाणे काम केलेले नाही, यामुळे तळागाळात त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ पक्षाला उचलता आलेला नाही. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यासारखे तरुण नेते नसणे देखील काँग्रेसला नुकसानीचे ठरले आहे. गुजरातमध्ये काँगेसच्या पराभवाचे आणखी एक मोठे कारण आम आदमी पक्षही मानला जाऊ शकतो. या पक्षाची कामगिरी विशेष राहिली नसली तरीही यामुळे काँग्रेस अधिकच कमजोर झाला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये काँग्रेसला यश मिळवून देऊ शकली नाही. तसेच बिगर गांधी अध्यक्षही पक्षासाठी कमाल करू शकलेला नाही.

मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजप चमकला

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी विजय मिळविला आहे. भाजपला यावेळी राज्यात मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येही मोठय़ा प्रमाणात यश मिळाले आहे. याचमुळे भाजपला राज्यात 150 चा आकडा पहिल्यांदाच ओलांडता आला आहे. विशेषम्हणजे मुस्लीमबहुल मतदारसंघ हे काँग्रेससाठी अनुकूल मानले जात होते, परंतु आम आदमी पक्ष आणि एआयएमआयएमने स्वतःचे उमेदवार उभे केल्याने भाजपला या मतदारसंघांमध्ये मोठे यश मिळविता आले आहे. 12 मुस्लीमबहुल मतदारसंघांपैकी 8 ठिकाणी भाजपने विजय मिळविला आहे.

पदरी अपयश तरीही केले चकीत

गुजरातमध्ये आपची एंट्री

गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ भाजपला प्रचंड बहुमत मिळाले असले तरीही राज्यात आम आदमी पक्षाच्या कामगिरीने सर्वांना चकीत केले आहे. विधानसभा निवडणुकीत केवळ 5 जागा जिंकता आल्या असल्या तरीही पक्षाची मतांची हिस्सेदारी वाढली आहे.

आम आदमी पक्षाला सुमारे 13 टक्के मते मिळाली आहेत. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची मतांची हिस्सेदारी वाढली आहे. आपने 2017 मध्ये गुजरातमध्ये 29 उमेदवार उभे केले होते आणि सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली होती. पक्षाला केवळ 0.10 टक्के मते मिळाली होती. आम आदमी पक्षापेक्षा अधिक मते नोटा पर्यायाला मिळाली होती. परंतु यावेळी आम आदमी पक्षाने लक्षणीय कामगिरी केली आहे. आम आदमी पक्षाने या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.  गुजरातच्या जनतेच्या मतांमुळे आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होणार आहे. शिक्षण आणि आरोग्याचे राजकारण पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात ओळख निर्माण करणार आहे, असे उद्गार आप नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत काढले आहेत.

‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी गुजरातच्या जनतेचे आभार. गुजरात हा मोदी आणि अमित शाह यांचा बालेकिल्ला आहे. 27 वर्षांपासून भाजपचे तेथे सरकार आहे. हा बालेकिल्ला भेदणे सोपे काम नव्हते. पहिल्या निवडणुकीच्या तुलनेत आपने त्यांचा बालेकिल्ला भेदला असल्याचा दावा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी 4 लोकसभा मतदारसंघातील विजयासह 6 अन्य लोकसभा मतदारसंघांमध्ये 6 टक्के मते मिळवावी लागतात. किंवा विधानसभा निवडणुकीत 4 जागा किंवा 6 टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागतात. गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाला 12 टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याने आपच्या नेत्यांनी राष्ट्रीय पक्ष ठरल्याचा दावा केला आहे, परंतु निवडणूक आयोगाच्या प्रमाणपत्रानंतरच अधिकृत स्वरुपात आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष मानले जाणार आहे.

रेवडी संस्कृती, तुष्टीकरण फेटाळले

गुजरातने रेवडी, तुष्टीकरण आणि पोकळ आश्वासनांच्या राजकारणाला फेटाळत भाजपला अभूतपूर्व कौल दिला आहे. या प्रचंड विजयाने महिला, तरुण-तरुणी, शेतकरी सर्व घटक पूर्ण मनाने भाजपसोबत असल्याचे स्पष्ट होते. गुजरातने नेहमीच इतिहास रचण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मॉडेलमध्ये जनतेचा अतूट विश्वास असल्याचे हा निकाल दर्शवितो.

– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पंतप्रधानांची लोकप्रियता, प्रतिमेचा विजय

विकास, सुशासन आणि जन कल्याणासाठी पक्षाच्या प्रतिबद्धतेचा हा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जनतेचा विश्वास, त्यांची लोकप्रियता आणि प्रतिमेला या विजयाचे श्रेय जाते. प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह सर्व नेत्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपने इतिहास रचला आहे.

– संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन

विकास आणि सुशासनाबद्दल पंतप्रधान नरेंद मोदींच्या प्रतिबद्धतेचा हा विजय आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला हा भव्य विजय मिळाला आहे. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. गुजरातच्या जनतेने भाजपला आशीर्वाद देत विजयाचा नवा विक्रम केला आहे.

– भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा

देशविरोधी घटकांना नाकारले

गुजरातच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. गुजरातच्या लोकांनी देशविरोधी घटकांना नाकारत भाजपच्या बाजूने मोठा कौल दिला आहे.

– मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल

पक्षसंघटनेची पुनर्रचना करू

काँग्रेस पक्ष जनतेचा कौल विनम्रपणे स्वीकारत आहे. आम्ही पक्ष संघटनेची पुनर्रचना करू, कठोर मेहनत करू. देशाचे आदर्श आणि गुजरातच्या जनतेसाठीचा लढा लढत राहणार आहोत.

– काँग्रेस नेते राहुल गांधी

Related Stories

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 32 हजार पार

Tousif Mujawar

मोदी सरकारची 8 वर्षे, भाजपकडून मोठी तयारी

Patil_p

उत्तराखंडात मागील 24 तासात ‘या’ वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

रामजन्मभूमी विश्वस्त संस्थेची स्थापना

Patil_p

आसाम : 12 हजार डुक्करांना ठार मारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

datta jadhav

President Draupadi Murmu : राष्ट्रपतींवर केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते उदित राज अडचणीत

Abhijeet Khandekar