कलम 370 हद्दपार केल्यावर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया मोठ्य़ा प्रमाणात घटल्या असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने घेतलेली कठोर भूमिका तसेच सुरक्षा दलांनी गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने केलेली धडक कारवाई यासाठी कारणीभूत ठरल्याचे मानण्यात येते. याचबरोबर खोऱयात आता स्थानिक काश्मिरी युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचे प्रमाण खूपच कमी झाल्याचेही समोर आले आहे. काश्मिरी युवकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनसाठी असलेले आकर्षण आता जवळपास संपुष्टात आले आहे. हिजबुलचा म्होरक्या सैयद सलाहुद्दीन तसेच हुर्रियतच्या फुटिरवादी नेत्यांनी लोकांना संघर्षाच्या आगीत लोटून स्वतःच्या कुटुंबासाठी मोठी माया लाटल्याचे काश्मिरी जनतेसमोर आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय अनेक दहशतवादी संघटनांपैकी एक हिजबुल मुजाहिद्दीन मागील काही काळापासून कारवायांबाबत मौन बाळगल्याचे चित्र दिसून येत आहे. अलीकडच्या काळात या संघटनेच्या नावावर कुठलाच मोठा हल्ला नोंद झालेला नाही. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी हिजबुल मुजाहिद्दीनला सतत नवनवे लक्ष्य देत आहे. काश्मीरमधील अल्पसंख्याक (हिंदू, शीख) आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करत आहे. जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचारी आपले काम संपवून घरी जात असल्यास किंवा बाजारात गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर हल्ले करा, असा आयएसआयने हिजबुल मुजाहिद्दीनला निर्देश दिला आहे. आयएसआयच्या आदेशवजा सूचनांकडे दुर्लक्ष करत दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने मौन बाळगले आहे. भारताने जशास तसे प्रत्युत्तर देण्याची घेतलेली भूमिका पाहता हिजबुल म्होरक्याने आता कारवायांपासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.
कोलमडत चाललेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सलाहुद्दीनचा खर्च झेलू शकत नाही का? सलाहुद्दीन पाकिस्तानात बसून हिजबुलच्या कारवायांवर नियंत्रण ठेवून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये त्याचे पाच पुत्र आणि दोन मुलींचे वास्तव्य आहे. भारतीय सुरक्षा दलांच्या एका अचूक रणनीतीने आयएसआयच्या प्याद्याला काश्मीर खोऱयात ‘खामोश’ बसण्यासाठी भाग पाडले आहे.
परिवार अन् सिक्रेट ऑपरेशन
पाकिस्तानात राहत असलेला सैयद सलाहुद्दीन ज्याचे दुसरे नाव सैयद मोहम्मद युसूफ शाह आहे, त्याला सैन्याधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱयांच्या धर्तीवर सुरक्षा तसेच अन्य सुविधा मिळतात. त्याच्याकडून वापरल्या जाणाऱया वाहनाचे नंबर प्लेट काळय़ा रंगाची असते. पाकिस्तानात सैन्य, आयएसआय आणि पोलिसांच्या वाहनांची नंबरप्लेट काळय़ा रंगाची असते. त्यावर पांढऱया रंगात अक्षरे किंवा क्रमांक लिहिले गेलेले असतात. सलाहुद्दीनच्या सुरक्षेकरता आयएसआयचे कमांडो आणि दहशतवादी पथके तैनात करण्यात आली आहेत. एका विशेष रणनीतीच्या अंतर्गत भारतीय सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीन प्रमुख सैयद सलाहुद्दीन अणि अन्य दहशतवादी संघटनांवरील कारवाईचा फास आवळला आहे. सलाहुद्दीनचे अनेक हस्तक म्हणजेच दहशतवाद्यांचा खोऱयात नायनाट करण्यात आला आह., तसेच दहशतवादी संघटनेत नव्या युवकांची भरती होण्यापासून रोखण्यास भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे.
एनआयए न्यायालयाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद, सैयद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसर्रत आलम यांच्यासारख्या अनेक देशाच्या शत्रूंच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. काश्मीरमध्ये राहत असलेले सलाहुद्दीनचे पाच पुत्र आणि दोन्ही मुली यापैकी बहुतांश जण शासकीय नोकरीत राहिले आहेत. परंतु मागील वर्षी सलाहुद्दीनचे दोन्ही पुत्र अहमद शकीलला आरोग्य विभाग आणि शाहिद युसूफ सलाहुद्दीनला सिंचन विभागातून बडतर्फ करण्यात आले होते. त्याचे दोन्ही पुत्र तुरुंगात पोहोचले आहेत. त्यांच्यावर हवालाद्वारे दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानचा नवा गेम प्लॅन
खोऱयातील दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यास यश येत आहे. दहशतवादी संघटना त्याच असल्या तरी त्या नव्या नावासह समोर येत आहेत. कुठे युनायटेड लिबरेशन प्रंट-जम्मू ऍण्ड काश्मीर (युएलएफ जेके) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतो, तर दुसरीकडे ‘गिलानी फोर्स’चे नाव समोर येते. ‘लष्कर-ए-तोयबा’ची नवी शाखा ‘द रेजिस्टेन्स प्रंट’ (टीआरएफ) देखील सद्यकाळात विशेष सक्रिय आहे. काश्मीर टायगर्स, पीएएफएफ, एलईएम आणि ‘हरकत 313’ यासारख्या हायब्रिड दहशतवादी गट उभे राहू पाहत आहेत. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय निर्बंधांपासून वाचण्यासाठी हा नवा गेम प्लॅन तयार केला असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस विभागाचे माजी महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली आहे.
कलम 370 हद्दपारची पार्श्वभूमी
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या हातचे बाहुले असल्याचे यापूर्वीच जगाला कळून चुकले आहे. कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर खोऱयातील दहशतवादी संघटनांवरील कारवाईने वेग पकडला आहे. एकाचवेळी अनेक भारतीय यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत असल्याने दहशतवादी संघटनांचे धाबे दणाणले आहेत. दहशतवादी संघटनांचे लोकल हँडलर कमजोर पडले आहेत.
पाकमधील आर्थिक संकट
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. यामुळे पाकिस्तानकडून दहशतवादाला पुरविण्यात येणारा वित्तपुरवठा अडचणीत आला असावा. या स्थितीचा फटका निश्चितच काश्मीर खोऱयात सक्रिय दहशतवादी संघटनांना बसला असण्याची शक्यता आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेबद्दल नाराज असलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयने सलाहुद्दीन यांचे पंख कापले असण्याची शक्यता आहे. हिजबुलला भारताविरोधात कारवायांसाठी पाकिस्तानकडून पुरविण्यात येणारा पैसा निश्चितच कमी झाला असेल. अशा स्थितीतच भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून कारवाईचा विळखा अधिकच घट्ट करण्यात आला आहे. भारत सरकारने सैयद सलाहुद्दीनला मोस्ट वाँटेड शेणीच्या दहशतवाद्यांच्या यादीत सामील केले आहे.
भारतीय यंत्रणांच्या निशाण्यावर
ऑगस्ट 2021 मध्ये सैयद सलाहुद्दीनने भारताला धमकी देणारा ऑडिओ मेसेज जारी केला होता. त्याने स्वतःच्या संदेशात तालिबानी दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावण्यास मदत करण्याचे आवाहन केले होते. अफगाणिस्तानातील इस्लामी अमिरातला मजबूत करावे, जेणेकरून ते भारताच्या विरोधात काश्मिरींना समर्थन करतील, अशी प्रार्थना करत असल्याचे सलाहुद्दीनने म्हटले होते. या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या परिवारावरून अनेक प्रकारच्या चौकशी सुरू केल्या होत्या. जुलै 2021 मध्ये सलाहुद्दीनच्या दोन्ही मुलांवर जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून कारवाईची कुऱहाड चालविली गेली. 2017 मध्ये सलाहुद्दीनचे पुत्र सैयद शाहिद युसूफच्या घरावर एनआयएने छापा टाकला होता.
पुत्राला टेरर फंडिंगप्रकरणी अटक
2011 च्या टेरर फंडिंग प्रकरणात शाहिदला अटक करण्यात आली. सलाहुद्दीनच्या आदेशावरून सीरियातील गुलाम मोहम्मद बट नावाच्या एका संशयिताने शाहिदला पैसे पाठविले होते. हा पैसा 2011 ते 2014 या कालावधीत येत राहिला होता. या पैशांचा वापर काश्मीर खोऱयातील दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आला होता. खोऱयात सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने युवकांना चिथावणी देण्याचे काम केल्याचे तपासात आढळून आले आहे. हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बुरहान वाणी 2016 मध्ये एका चकमकीत मारला गेला होता. बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय होता. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची स्थापना 1989 मध्ये काश्मिरी फुटिरवादी मुहम्मद एहसान डारने केली होती. नंतर याची धुरा दहशतवादी सलाहुद्दीनच्या हातात आली. पाकिस्तानातून या दहशतवादी संघटनेच्या कारवायांवर तो नियंत्रण ठेवून आहे.