वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रायबरेली येथील हॉकी स्टेडियमला भारतीय हॉकी संघातील अव्वल खेळाडू राणी रामपालचे नाव देण्यात आले आहे. हॉकी स्टेडियमचे महिला हॉकीपटूचे नामकरण पहिल्यांदाच करण्यात आले असून हा बहुमान मिळवणारी राणी रामपाल ही पहिली महिला हॉकीपटू आहे.
रायबरेलीतील या स्टेडियमला यापूर्वी एमसीएफ या नावाने ओळखले जात होते. आता या स्टेडियमचे दुसऱ्यांदा नामकरण करण्यात आले आहे. या हॉकी स्टेडियमध्ये अद्यावत हॉकी टर्फची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आता हे स्टेडियम राणी गर्ल्स हॉकी टर्फ असे संबोधले जाईल. या स्टेडियमच्या नव्या नामकरण समारंभावेळी हॉकी इंडियाचे विविध पदाधिकारी तसेच हॉकी क्षेत्रातील आजी, माजी हॉकीपटू उपस्थित होते. राणी रामपालने चालू वर्षाच्या प्रारंभी भारतीय महिला हॉकी संघात आपले पुनरागमन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावेळी केले आहे. 2021-22 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या हॉकी प्रो लिगमध्ये राणी रामपालने आपला शेवटचा सामना बेल्जियम संघाविरुद्ध खेळला होता. 28 वर्षीय राणी रामपालने आतापर्यंत 250 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे राणी रामपालला 2022 सालातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेला मुकावे लागले होते.