सामनावीर काईल मेयर्स
वृत्तसंस्था / ऍमस्टरडॅम (हॉलंड)
विंडीज क्रिकेट संघाने यजमान हॉलंडला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ‘व्हाईटवॉश’ केला. या मालिकेतील रविवारी झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामान्यात विंडीजने हॉलंडचा 20 धावांनी पराभव केला. विंडीजच्या मेयर्सला ‘सामनावीर’ तर अकील हुसेनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 50 षटकांत 5 बाद 308 धावा जमविल्या. त्यानंतर हॉलंडचा डाव 288 धावांत संपुष्टात आला. विंडीजच्या डावात ब्रुक्सने नाबाद शतक (101) झळकविले.
विंडीजच्या डावाला दमदार सुरूवात करून देताना शाय होप आणि मेयर्स यांनी 12 षटकांत 58 धावांची भागिदारी केली. हॉलंडच्या डिलेडीने होपला 24 धावावर बाद केले. त्यानंतर ब्रुक्स आणि मेयर्स या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 184 धावांची भागिदारी केली. मेयर्सने 106 चेंडूत 120 धावा झळकविल्या. ब्रुक्सने नाबाद 101 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हॉलंडच्या डावात विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओ दाऊदने सलामीच्या गडय़ासाठी 98 धावांची भागिदारी केली. विक्रमजीत सिंगने 54 तर मुसा अहमदने 42 धावा जमविल्या. ओ दाऊदने डिलेडीसमवेत 42 धावांची भागिदारी केली. डिलेडीने 25 धावा जमविल्या. 43 षटकाअखेर हॉलंडची स्थिती 4 बाद 239 अशी होती. त्यांना शेवटच्या सात षटकांत विजयासाठी 70 धावांची जरूरी होती. यष्टीरक्षक एडवर्डस्ने 18, व्हॅन बेकने 15 तर कर्णधार सिलेरने 16 धावा जमविल्या. हॉलंडचे शेवटचे सहा फलंदाज 49 धावांत बाद झाले. विंडीजतर्फे हेडन वॉल्शने 2 तर अकिल हुसेनने दोन गडी बाद केले. लेवीसने 67 धावांत 3 बळी मिळविले. पुरनच्या नेतृत्वाखाली विंडीजने ही पहिली वनडे मालिका जिंकली आहे. विंडीज संघाचा हॉलंडचा हा पहिला दौरा आहे.
संक्षिप्त धावफलक
विंडीज- 50 षटकांत 5 बाद 308 (ब्रुक्स नाबाद 101, मेयर्स 120, बॉनेर 19, होप 24), हॉलंड- सर्वबाद 288 (विक्रमजीत सिंग 54, मुसा अहमद 42, डिलेडी 25, एडवर्डस् 18, सिलेर 16, ओ दाऊद 89, लेवीस 3-67, अकिल हुसेन आणि हेडन वॉल्श प्रत्येकी 2 बळी).