’सेव्ह म्हादई’ मंचचा मांडवीतिरी अनोखा उपक्रम
प्रतिनिधी/ पणजी
राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी म्हादई वळविण्याचे सरकारचे षडयंत्र मोडून काढण्याच्या उद्देशाने ’सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ मंचतर्फे शनिवारी पणजीत मांडवी तिरावर होम हवन करण्यात आले. ’म्हादईचे पाणी वळविण्यापासून कर्नाटकाचे मन वळव, म्हादईचे रक्षण कर’, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
मंचच्या नेत्या तारा केरकर यांनी या हवनाचे यजमानपद केले. त्यावेळी अॅड. हृदयनाथ शिरोडकर, प्रतिमा कुतिन्हो, तनोज अडवलपालकर, प्रजल साखरदांडे, यांच्यासह अन्य म्हादईप्रेमी उपस्थित होते. म्हादईचे पाणी वळविल्यास गोमंतकीय पाण्यासाठी वंचित तर होणार आहेतच. येथील वनराई, प्राणीमात्र आणि एकुणच सजीवश्रृष्टी यांचाही नाश होणार आहे. पर्यावरणाच्या जतनासाठी म्हादईचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे म्हादईचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
पाण्याला कोणताही धर्म नसतो, जात नसते. पाणी हे सर्वांसाठी एकसमान असते. त्यामुळे त्यावर प्रत्येक प्राणीमात्राचा अधिकार आहे. अशावेळी गोमंतकीयांचा हक्क हिरावून कर्नाटक म्हादईचे पाणी स्वत:च्या राज्यात वळवू इच्छित आहे हा खरोखरच गोमंतकीयांवर अन्याय आहे, असे मत अॅङ शिरोडकर यांनी व्यक्त केले.
अशा या घातकी कृत्यापासून कर्नाटकाला रोखावे या उद्देशानेच होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते, म्हादई वळविणाऱ्यांना देवाने चांगली बुद्धी द्यावी, अशी मागणी करण्यात आली, असे शिरोडकर यांनी पुढे सांगितले. सदर हवन सत्कारणी लागावे यासाठी यजमानांच्या हस्ते मांडवी नदीत श्रीफळ अर्पण करण्यात आले.