वार्ताहर /धामणे
देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, धामणे येथे गणरायाचे जल्लोषी स्वागत करत ढोल-ताशांच्या गजरात बुधवारी सकाळपासूनच गणपतीचे आगमन झाले. आणि प्रत्येक घरात गणपतीची प्रतिष्ठापना करून भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले.
मागील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे गणेशोत्सव आणि इतर सर्व सण साधेपणाने करण्यात आले होते. यंदा सर्वत्र वातावरण चांगले असल्याने शासनाकडूनसुद्धा गणेशोत्सवसाठी हिरवा कंदील दिल्याने गणेशोत्सव यंदा मोठय़ा आनंदात साजरा करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी सूर्योदयापासून घरातील गणपती आणण्याची लगबग, धामणे, मासगौंडहट्टी, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या गावातून दिसून आले. फटाक्याची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात आपापल्या परीने काही जण वाहनातून तर काही डोकीवरून गणपती आणत होते. दिवसभर घरगुती गणपती आणल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक गणपती आणण्यासाठी प्रत्येक मंडळाचे गणेश भक्त कामाला लागून रात्री उशिरापर्यंत या भागातील सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुका फटाक्याच्या आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात रात्री मंडपात येऊन गणपतीची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आल्याचे दिसून आले.